दामिनी पालवला न्याय मिळवून देण्यासाठी कडावलमध्ये आज विशेष बैठक

सायंकाळी ६ वाजता महापुरुष मंदिरात श्रद्धांजली सभा
पंचक्रोशीतील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
तालुक्यातील वर्दे येथील २३ वर्षीय दामिनी किरण पालव हिच्या निर्घृण हत्येने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दामिनीला न्याय मिळावा आणि तिच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी आज, रविवार १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता कडावळ येथील महापुरुष मंदिरात विशेष व श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
दामिनीच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होण्यासोबतच या प्रकरणाचा तपास जलद, निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने करून संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी या सभेतून करण्यात येणार आहे. तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही सभा केवळ श्रद्धांजली अर्पण करण्यापुरती मर्यादित नसून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणत अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजनांची गरज अधोरेखित करण्याची संधीही आहे. दामिनीच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देतानाच न्यायाच्या मागणीला लोकशाही मार्गाने बळ देण्याचा या सभेचा उद्देश आहे.
या न्यायसभा व श्रद्धांजली सभेला पंचक्रोशीतील नागरिकांसह संपूर्ण तालुक्यातील माता-भगिनी, युवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





