दामिनी पालव खून प्रकरणातील संशयित साईल धुरी पोलिसांच्या ताब्यात

मठ येथील घरातून मध्यरात्री उचलले
हत्येमागील कारणाचा उलगडा होणार
वर्दे येथील महाविद्यालयीन तरुणी दामिनी किरण पालव हिच्या निर्घृण खून प्रकरणातील संशयित साईल विश्राम धुरी याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील त्याच्या घरातून मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी संशयिताचा शोध घेतल्याने या प्रकरणाच्या तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे.
वर्दे येथे काल सायंकाळी दामिनी पालव हिच्यावर धारदार चाकूने वार करून तिची हत्या करण्यात आली होती. भरवस्तीत घडलेल्या या घटनेनंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाला होता. या प्रकारामुळे वर्दे परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी तपासाला गती दिली. संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथके तैनात करण्यात आली होती. जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करून विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर पोलिसांनी मठ येथील घरातून साईल धुरी याला ताब्यात घेतले.
हत्येमागील कारण काय?
दामिनीच्या हत्येमागील नेमके कारण काय, हा खून पूर्ववैमनस्यातून झाला की अन्य कोणत्या कारणातून, याचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. संशयिताची चौकशी सुरू असून, तपासातून हत्येमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.






