तरुणीच्या हत्येतील आरोपीच्या अवघ्या ५ तासांत आवळल्या मुसक्या; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांची धडाकेबाज कामगिरी

वर्दे येथील कॉलेजवयीन युवती दामिनी किरण पालव हिचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवघ्या ५ तासांच्या आत गजाआड केले आहे. साहिल विश्राम धुरी (रा. मठ धुरीवाडा, ता -वेंगुर्ले जि. सिंधुदुर्ग) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून हा क्रूर प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
ही दुर्दैवी घटना १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली होती. हत्येनंतर आरोपी साहिल घटनास्थळावरून मोटरसायकलवरून पळून जात असताना एका प्रत्यक्षदर्शीने पाहिले होते.
माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवली. CCTV तंत्रज्ञान व मानवी कौशल्याचा अत्यंत प्रभावी वापर करून आरोपीचा माग काढण्यात आला. जवळच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात संशयित युवक आणि मोटरसायकल दिसून आली. त्यानंतर मोटरसायकलच्या नंबरवरून आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एलसीबीच्या पथकाने वेंगुर्ले तालुक्यातील मठ-धुरीवाडा येथील आरोपी साहिल धुरी याला मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी कुडाळ पोलिसांच्या हवाली केले.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मयत दामिनी आणि आरोपी साहिल यांची गेल्या दोन वर्षांपासून इंस्टाग्रामवर ओळख होती. साहिलचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते आणि वर्षभरापूर्वी त्याने तिला प्रपोज केले होते. मात्र, दामिनीने त्याला स्पष्ट नकार दिला होता. आपल्या प्रेमाला प्रतिसाद देत नसल्याच्या रागातून साहिलने हे टोकाचे पाऊल उचलून दामिनीची चाकूने वार करून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची चर्चा आहे. या प्रकरणातील नेमकी घटना, हत्येमागील कारणे आणि आरोपीची भूमिका याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कौतुकास्पद व जलद कारवाईमुळे नागरिकांमधून पोलिसांचे कौतुक होत आहे.
सदरची यशस्वी कारवाई मा. श्री. मोहन दहिकर (पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग) व मा. कु. नयोमी साटम (अप्पर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग) यांच्या सुचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली API -सनील पाटील, PSI -हनुमंत भोसले, PSI -अनिल हडळ, PSI -सुधीर सावंत व त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने पार पाडली आहे.





