खून प्रकरणातील आरोपी कुणाल कुंभारचा जामीन अर्ज फेटाळला

कुडाळ : तालुक्यातील घावनळे येथील अल्पवयीन मुलीच्या खुन प्रकरणातील आरोपी कुणाल कृष्णा कुंभार याचा नियमीत जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग यांनी फेटाळला आहे, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कुडाळ तालुक्यात घावनळे येथील अल्पवयीन मुलगी (वय १७ वर्षे ०२ महीने) ही दुसऱ्या मुलासोबत बोलते या कारणावरुन तिच्या परीचयाचा कुणाल कृष्णा कुंभार (रा. गाठोस ता. कुडाळ) याने वाडोस येथे नेवुन नायलॉन दोरीने गळा आवळून तिचा खून केला. या गुन्हयातील आरोपी विरुद्ध पोलीसांनी सबळ पुरावा गोळा करुन दोषारोप पत्र मुदतीत न्यायालयात सादर केलेले आहे. या गुन्हयातील आरोपी कुणाल कुंभार हा दि. ३०.०९.२०२५ रोजी पासुन प्रथम पोलीस कोठडी रिमांड व त्यानंतर न्यायालयीन कोठडी रिमांडमध्ये जिल्हा कारागृहामध्ये बंदीस्त आहे.
आरोपी कुणाल कृष्णा कुंभार याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग यांचे न्यायालयात नियमित जामीन मिळणेकरीता अर्ज सादर केलेला होता. त्या अर्जाची सुनावणी न्यायालयात झाली. न्यायालयात आरोपीत याचे विरुद्ध प्राप्त पुरावे व अन्य केसचे दाखले अभियोग पक्षातर्फे सविस्तर मांडण्यात येवुन आरोपीचे जामीन अर्जास कडाडून विरोध करण्यात आला. न्यायालयाने आरोपीचे वकील व अभियोग पक्षाचे म्हणणे ऐकून घेवुन आरोपीत याने स्वतःहून दाखविलेला मृतकाचा मृतदेह, तसेच सदर गुन्हा हा जलद गती न्यायालयात सुनावणीकरीता घेणार असल्याचे अभियोग पक्षातर्फे मांडण्यात आलेले मुद्दे विचारात घेवुन तसेच आरोपीत विरुद्ध गुन्हा केल्याचा सबळ पुरावा असल्याची नोंद घेवुन नमुद आरोपीत याचा नियमित जामीन अर्ज फेटाळला. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे वकील रुपेश देसाई यांनी काम पाहीले.
ही कारवाई ही पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद काबळे, कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, पोलीस अंमलदार कृष्णा केसरकर यांनी केली आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

error: Content is protected !!