शिक्षक समितीचे कार्य शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे-उपशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर

समितीची जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा संपन्न
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्गातील आठ तालुक्यांमध्ये १४४ केंद्रावर २९३४ विद्यार्थ्यांची इयत्ता पाचवी मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा गुरुवारी (ता.१५ रोजी)संपन्न झाली. या सराव परीक्षेचे जिल्हास्तरीय उद्घाटन दोडामार्ग तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा साटेली भेडशी येथे जि.प.सिंधुदुर्ग शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर यांच्या हस्ते झाले. जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती परीक्षा उदघाटन प्रसंगी बोलताना श्री.शेर्लेकर यांनी शिक्षक समिती ही संघटना शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभा प्रमाणे कार्य करीत आहे असे गौरवोद्गार काढले.यावेळी शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हासरचिटणीस तुषार आरोसकर, केंद्रप्रमुख सूर्यकांत नाईक, सुधीर जोशी , अंजली जोशी, तालुकाध्यक्ष महेश काळे जिल्हा कार्यकारणी सदस्य अशोक भोसले, मुख्याध्यापिका श्रीमती पालव तसेच प्रभागातील शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी पुढे बोलताना श्री.शेर्लेकर म्हणाले की, ज्याप्रमाणे समिती शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी लढा देते तसेच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सराव परीक्षे सारखे अनेक उपक्रम राबविते हे निश्चितच कौतुकास्पद आहे. जिल्हाध्यक्ष श्री.गवस यांनी शिक्षक समितीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली,तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अशोक भोसले यांनी सूत्रसंचालन केले तर महेश काळे यांनी आभार मानले.





