पंडीत दिनदयाळ योजने अंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान मिळाल्याचा आनंद

गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांचे प्रतिपादन
कणकवली तालुक्यातील जमीन खरेदीसाठी २० लाभार्थ्यांना अनुदान मंजुरीचे पत्र वाटप
कणकवली तालुक्यातील जे बेघर आहेत , ज्यांच्याकडे स्वत:ची जमीन नाही अशा काही दुर्बल घटकांना पंतप्रधान आवास योजनेत लाभ मिळून देण्यासाठी जमीन आवश्यक असते, ती जमीन खरेदी करण्यासाठी पंडीत दिनदयाळ योजने अंतर्गत संबंधित गावातील लाभार्थ्यांचे प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात आले होते. मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर व सरपंच यांच्या पाठपुराव्यामुळे 20 प्रस्तावांना मंजुरी आली असून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमीन खरेदीची रक्कम जमा होणार आहे. पंडीत दिनदयाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी अनुदान मंजूर झाल्याचा सर्वांनाच आनंद असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी केले.
कणकवली पंचायत समितीच्या प. पु. भालचंद्र महाराज सभागृहात प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असलेल्या दुर्बल घटकातील 20 लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी मंजुर अनुदानाचे मंजुरीचे पत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, फोंडाघाट सरपंच संजना आंग्रे, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, प्रशिक्षणार्थी सहाय्यक गटविकास अधिकारी तेजश्री गायकवाड, तन्मय मांढरेकर, कलमठ ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, फोंडाघाट ग्रामपंचायत अधिकारी मंगेश राणे आणि कलमठ सदस्य अनुप वारंग सदस्य अनुप वारांग ,नितीन पवार, श्रेयस चिंदरकर यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
अरुण चव्हाण म्हणाले, या पंडीत दिनदयाळ योजनेअंतर्गत पाठवलेल्या प्रस्तावांचा अनेक दिवस पाठपुरावा सुरू होता. काही तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रियेला वेळ लागला, मात्र आता कलमठ, करंजे आणि फोंडाघाट येथील 20लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे. लाभार्थ्यांना अर्धा व एक गुंठा जमीन खरेदीसाठी लागणारी रक्कम मंजूर झाली आहे. कलमठ ग्रामपंचायतमध्ये पंतप्रधान आवास योजनेसाठी एकत्रित पंतप्रधान आवास योजना गृहनिर्माण प्रकल्प राबवणारी पहिली ग्रामपंचायत आहे.
या प्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आणि प्रकल्प संचालक उदय पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच कलमठ येथील पत्रकार भगवान लोके यांनी आपली जमीन या योजनेसाठी सेवाभावी वृत्तीने उपलब्ध करून दिली. त्यांच्या या दातृत्वाचे कौतुक करत करत गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी पंचायतसमितीच्यावतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. यावेळी तालुक्यातील लाभार्थ्यांना अनुदान मंजुरीचे पत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुर्यकांत वारंग यांनी केले.





