चेंदवण हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी विज्ञान मॉडेल प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या विज्ञान मॉडेल प्रदर्शनाची संकल्पना विज्ञान शिक्षिका सौ. उर्मिला गवस यांनी मांडली असून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पकता व नवसर्जनशीलता रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा समिती अध्यक्ष देवेंद्र नाईक यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी शाळा समिती सदस्य संजय नाईक, संस्था सदस्या सौ. रश्मी नाईक, संस्था सदस्य गोविंद भरडकर, मसुरकर सर, माजी विद्यार्थी रुपेश खडपकर, उदय खडपकर, अण्णा भरडकर तसेच कवठी गावच्या उपसरपंच सौ. ऋतुजा खडपकर उपस्थित होते.
याशिवाय पालक प्रतिनिधी म्हणून सौ. विनिता मेस्त्री, सौ. राजश्री धुमाळ, श्री. नाईक, श्री. प्रविण भरडकर व श्री. भरडकर यांचीही उपस्थिती लाभली.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञानाशी संबंधित विविध उपयुक्त व कल्पक मॉडेल सादर करून आपली वैज्ञानिक जाणीव व सर्जनशीलता दाखवून दिली. पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत, आरोग्य, तंत्रज्ञान, शाश्वत शेती, डिजिटल इंडिया यांसारख्या विषयांवर आधारित प्रयोगांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त करताना सांगितले की, आज या प्रदर्शनात मांडलेले प्रत्येक प्रकल्प हे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, कष्टाचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे जिवंत उदाहरण आहेत. असे उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्याची दिशा दाखवतात.
प्राथमिक शाळा चेंदवण नं. १ तसेच श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन मॉडेल्सची माहिती घेतली.
या उपक्रमास मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे व कल्पकतेचे पालकवर्गातून विशेष कौतुक करण्यात आले. विज्ञान शिक्षिका सौ. उर्मिला गवस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाबद्दल गोडी निर्माण करणारा ठरला, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!