चिंदर गावच्या ऐतिहासिक तलाव सुशोभीकरण कामाचा शुभारंभ

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते झाला शुभारंभ
चिंदर गावच्या पर्यटन दृष्ट्या विकासात महत्वपूर्ण ठरणा-या ऐतिहासिक शिवकालीन तलावाच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना सावंत यांनी
प्रत्येक गावाने आपल्या गावची एकी टिकवण्यासाठी राजकीय व्यासपीठ बाजूला ठेवून एकत्र येऊन विकास काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यातूनच गावचा विकास व्हायला वेळ लागणार नाही धोंडी चिंदरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत धार्मिक पद्धतीने गावाला विश्वासात घेऊन या कामाचा शुभारंभ केला आहे. या निमित्ताने एक नवा पायंडा सुरू केला आहे त्याचा आनंद आहे असे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी चिंदर येथे व्यक्त केले .
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत चिंदर गावच्या पर्यटन दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या ऐतिहासिक शिवकालीन तलावाच्या सुशोभीकरण व पायाभूत सुविधांच्या विकास करणे या कामांसाठी पाच कोटी विकास निधी मंजूर झाला आहे.
या कामाचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, सरपंच स्वरा पालकर, उपसरपंच महेंद्र मांजरेकर, मधुकर पाताडे, प्रमुख मानकरी देवेंद्र पाताडे, बाबा मोंडकर, महेश मांजरेकर,दिपक सुर्वे, प्रकाश मेस्त्री, देवेंद्र हडकर, संतोष गावकर, अरुण घाडी, नांदोस उपसरपंच विजय निकम, दाजी सावजी, भाई तावडे, यांसह चिंदर गावचे बारापाच मानकरी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. यावेळी बोलताना धोंडू चिंदरकर यांनी सांगितले की सातत्य पूर्ण प्रयत्नातून या तलावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध झाला आहे. यासाठी खासदार नारायण राणे, तत्कालीन पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार निलेश राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गावविकासासाठी सर्वांनी एक होऊन काम करण्याची गरज आहे. यासाठी आपण एकदिलाने पाठीशी राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमानिमित्त धार्मिक कार्यक्रम, जलपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. बहुसंख्य महिलांनी सहभागी होत कलश पूजनही केले .





