जुनाट वटवृक्ष फांदी तोड प्रकरणी कुडाळात वृक्षमित्र एकवटले

फांदी तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
पोलिसांनी कारवाईसाठी घेतली दोन दिवसांची मुदत
शहरात जिजामाता चौकात दीडशे वर्षे जुन्या वटवृक्षाची फांदी तोडल्याप्रकणी कुडाळमधील वृक्षप्रेमी एकत्र आले आहेत. त्या वृक्षप्रेमी नागरिकांनी आज कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेतली. या झाडाची फांदी तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी वृक्षप्रेमींकडून करण्यात आली. दरम्यान दोन दिवस सखोल चौकशी करून गुन्हेगारावर कारवाई करू अशी ग्वाही पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी वृक्षप्रेमी नागरिकांना दिली.
कुडाळ शहर जिजामाता चौक पुतळ्यासमोर १५० वर्षापूवीचे वडाचे झाड आहे. या झाडाची फांदी सोमवारी १५ डिसेंबरला पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमाराला तोडण्यात आली. याबाबत कुडलमधले सर्वपक्षीय वृक्षप्रेमी एकत्र आले. त्यांनी या प्रवृत्तीचा निषेध करत कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेतली. ज्याने कोणी हे कृत्य केले असेल त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी वृक्षमित्रांतर्फे करण्यात आली. अशा आशयाचं निवेदन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना देण्यात आलं. या निवेदनात म्हटलं आहे, संबंधित झाडाच नुकसान करुन त्याप्रमाणे मनुष्यहानीचा सुद्धा प्रयत्न होता, अस प्रत्यक्षदर्शी दिसत. या पुर्वी सुद्धा कुडाळ पोस्टमार्टम रुमकडील रस्त्यावर सहा झाडे तोडण्यात आली आहेत. त्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे पत्र २९ मे २०२५ रोजी वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय कुडाळ यांनी दिले आहे. परंतु त्यावर ठोस कारवाई झाली नसल्यानं याच विघ्नसंतोषी व्यक्तीकडून पुन्हा असे प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊन कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी चर्चेवेळी दोन दिवसांची मुदत द्या. संबंधित प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल असं वृक्षप्रेमींना आश्वस्त केलं. पोलीस या प्रकरणाचा तपस करत असून सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला जात आहे.
यावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, नगरसेवक मंदार शिरसाट, नगरसेवक चांदणी कांबळी, शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, व्यापारी संघ तालुका अध्यक्ष श्रीराम शिरसाट, विजय उर्फ आनंद वालावलकर, अमरसेन सावंत, बबन बोभाटे, मंदार चंद्रकांत शिरसाट, गुरुनाथ गडकर, संदीप कोरगावकर, श्री. पाटकर, विजय प्रभू, सुधार समितीचे प्रसाद शिरसाट, अभय शिरसाट, नितीश म्हाडेश्वर आणि कुडाळमधील वृक्षप्रेमी नागरिक उपस्थित होते.





