संतोष परब मारहाण प्रकरणी तत्कालीन आमदार नितेश राणेंसह तिघे दोषमुक्त

संदेश उर्फ गोट्या सावंत आणि राकेश परब यांचा दोषमुक्ततेत सहभाग
कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली माहिती.
सिंधुदुर्ग : कणकवलीमध्ये संतोष मनोहर परब या राजकीय कार्यकर्त्याला मारहाण केल्या प्रकरणी तत्कालीन आमदार आणि विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि राकेश प्रल्हाद परब यांना जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक १ यांनी दोषमुक्त केले आहे. अशी माहिती ऍड. संग्राम देसाई यांनी दिली. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ऍड. संग्राम देसाई म्हणाले, दि. १८ डिसेंबर २०२१ रोजी संतोष परब या राजकीय कार्यकर्त्यावर हल्ला झाला होता. त्याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७, २०१, १२० ब आणि ३४ अव्यये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी तपास करून एकूण ११ आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केली होती. यामध्ये नितेश राणे, संदेश उर्फ गोट्या सावंत, राकेश प्रल्हाद परब या सिंधुदुर्गातील आरोपींसह सचिन ज्ञानदेव सातपुते, ज्ञानेश्वर उर्फ माउली दिगंबर देवनुरे, धीरज व्यंकट जाधव, करण बाळासाहेब कांबळे, चेतन यशवंत पवार, अनिल शंकर नक्का, करण दत्तू कांबळे, दीपक नामदेव वाघोदे (सर्व रा. पुणे) यांचा समावेश होता. हे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या सर्वनाच्या विरुद्ध पोलिसांनी तपासात आढळलेला जो काही पुरावा होता तो या दोषारोपपत्रासोबत सादर केला. परंतु पहिल्यापासूनच आरोपींच्या वतीने त्यांच्या वकिलांचे असे म्हणणे होते कि या संपूर्ण प्रकरणात त्यांचा काही संबंध नाही. त्यामुळे दोषारोप पत्र दाखल झाल्यांनतर नितेश राणे, संदेश उर्फ गोट्या सावंत आणि राकेश परब या तीन आरोपींच्या वतीने दोषमुक्तीचा अर्ज देण्यात आला होता. सर्वसाधारणपणे एखादा खटला चालल्यानंतर आरोपीला दोषी किंवा निर्दोष धरले जाते. परंतु मुळातच पोलिसांनी गोळा केलेला जो काही पुरावा होता या पुराव्यावर आधारित आरोपींविरुद्ध दोषारोप ठेवला जाऊ शकत नाही. अशा पद्धतीची विनंती आरोपींच्या वतीने त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला केली होती. त्या अर्जावर सुनावणी होऊन नितेश राणे, संदेश उर्फ गोट्या सावंत आणि राकेश परब या तीनही आरोपींची या गुन्ह्यातून दोषमुक्तता करण्यात आली, असे ऍड. संग्राम देसाई म्हणाले.
ऍड. देसाई पुढे म्हणाले, सर्वसाधारणपणे साक्षी पुरावे घेतल्यानंतर एखादी व्यक्ती दोषी अणे कि निर्दोष आहे ते ठरले जाते. परंतु आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही नियम घालून दिलेले आहेत, त्यानुसार जर दोषारोप पत्र आहे तसे स्वीकारले, त्या मध्ये असलेली विधाने, त्यामध्ये असलेले जबाब, आहे तसे जरी स्वीकारले तरी देखील जर आरोपी विरुद्ध पुरावा होत नसेल. तर मग त्याला दोषमुक्त करावे लागते. कणकवली पोलिसांनी जे दोषारोप पत्र दाखल केले त्या संपूर्ण दोषारोप पत्रात असलेले कागदपत्र, जाबजबाब किंवा इतर जे एकही डॉक्युमेंट्स होते त्या सगळ्या डॉक्युमेंट्सचा विचार करून आरोपी क्रमांक एक नितेश नारायण राणे, आरोपी क्रमांक दोन संदेश उर्फ गोट्या श्रीधर सावंत, आरोपी क्रमांक चार राकेश प्रल्हाद परब या तिघांच्याही विरुद्ध दोषारोप ठेवण्या इतपत देखील नसल्याने कोणताही पुरावा नसल्याने आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायधीश क्रमांक एक यांनी त्यांची दोषमुक्तता केली आहे. असे ऍड. देसाई यांनी सांगितले.
दरम्यान उरलेले सर्व आठ आरोपी हे पुण्याचे आहेत. त्यांच्या विरुद्धचा खटला चालेल. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा खटला होता, असे ऍड. संग्राम देसाई यांनी सांगितले. यामध्ये ऍड. संग्राम देसाई यांच्यासह ऍड. अविनाश परब, ऍड. सुहास साटम, ऍड. जान्हवी दुधवाडकर, ऍड. संजना देसाई, ऍड. सौरभ देसाई यांनी युक्तीवाद केला.





