कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!

कणकवली शहर भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे इच्छुकांच्या नावांची यादी सोपवणार

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती

कणकवली शहरामध्ये गेले काही वर्षे नगरपंचायत मध्ये सत्ता असताना येत्या निवडणुकीमध्ये कणकवली शहरात 17 प्रभागांमध्ये भाजपाचे एका प्रभागात एका जागेसाठी दोन तर काही ठिकाणी त्यापेक्षाही अधिक उमेदवार हे इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपाच्या प्रत्येक निष्ठावान व पक्षाशी प्रामाणिक असणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा व गेले अनेक वर्ष पक्षाशी प्रामाणिक राहिलेल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर भाजपाची ताकद कणकवली शहरात दिसावी अशी भूमिका कणकवलीत भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आली. कणकवली शहरातील 17 प्रभागांमधील पक्षासोबत प्रामाणिक असलेल्या इच्छुक उमेदवारांची नावे ही पक्षाचे नेते खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांना देण्यात येणार आहेत अशी माहिती कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. तसेच पक्षाच्या इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका या बैठकीमध्ये घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. श्री नलावडे यांच्या निवासस्थानी नुकतीच कणकवली शहरातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी यांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. गेली अनेक वर्ष कणकवली नगरपंचायत वर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्ते दाखल झाल्यानंतर कणकवली शहरात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निष्ठेने गेली अनेक वर्ष पक्षाचे काम केले. या कार्यकर्त्यांची जनतेशी नाळ जुळलेली असल्याने प्रत्येक प्रभागात एकापेक्षा अनेक उमेदवार इच्छुक आहेत. होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेत पक्षामध्ये इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांच्या नावांची यादी त्यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली शहरातील भाजपा पक्ष हा मजबूत व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जोरावर उभा आहे. त्यामुळे पक्षाशी निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होता नये अशी भूमिका श्री नलावडे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय द्यावा याकरिता उद्या या नेत्यांची भेट घेत त्यांचे या मुद्द्यावर लक्ष वेधणार असून शहरातील भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती या नेत्यांना देण्यात येणार असल्याची माहिती श्री नलावडे यांनी दिली.

error: Content is protected !!