104 वर्षानंतर चंद्रभागा अनंतात विलीन.

कणकवली/प्रतिनिधी

असा जन्म लाभला,देहाचे चंदन झाले.
गंध सोडला तरी,सुगंध दरवळत राहिला.
चंद्रभागेने १०४वर्षानंतर वैकुंठवारीचा दिवस निश्चित केला. साडेतीन मुहूर्तापैकी एक, विजयादशमी २ऑक्टोबर २०२५ रोजी ती अनंतात विलीन झाली.
नरडवे, पिंपळवाडीत २१ एप्रिल १९२१ रोजी, कै. श्री. लक्ष्मण राणे आणि कै. सौ. उर्मिला राणे या दांपत्यास कन्यारत्न प्राप्त झाले. पाळण्यात तिचं नाव गंगू असं ठेवण्यात आलं. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात या चार बहिणी व दोन भाऊ अशा सहा भावंडात तिचं बालपण गेलं. चंद्रभागा दिसायला उंच, गोरी,तपकिरी डोळे, सडपातळ,लांबसडक केस अशी सुंदर होती. पुढे वयाच्या सतराव्या वर्षी दिगवळे,बामंदेवाडी येथील श्री.दाजी कृष्णा देसाई यांच्याशी तिचा विवाह संपन्न झाला. श्री. दाजी कृष्णा देसाई हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं, त्यांची ख्याती फक्त पंचक्रोशीत नसून त्या काळात ते समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे संपूर्ण कणकवली तालुक्यात होती. मोठं घर,एकत्र कुटुंब,कुटुंबात भरपूर माणसे, गुरेढोरे, गडी माणसे अशाप्रकारे त्यांचा सुखी संसार सुरू झाला. सहा मुलें व तीन मुली असा त्यांचा परिवार वाढत गेला. धाकटा मुलगा तीन महिन्याचा असतानाच मात्र दोघांच्या सुखी संसाराला नियतीची दृष्ट लागली आणि श्री. दाजी कृष्णा देसाई हे साथ अर्धवटच सोडून स्वर्गवासी झाले. नऊ मुलं पदरात असूनही चंद्रभागा डगमगली नाही. कुटुंबाची साथ होतीच पण मुलांच्या भविष्याचा, शिक्षणाचा ‘यक्ष’ प्रश्न उभा राहिला; पण तिने न घाबरता हा संसारचा शिवधनुष्य समर्थपणे पेलला. शांतता,संयम, अपार कष्ट, जिद्द , मेहनत व कामसू वृत्ती या गुणांच्या साथीने तिने मुलांचे पालन पोषण व शिक्षण पूर्ण केले. मोठा मुलगा जनार्दन, बँक ऑफ इंडिया, मुंबई येथून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाला. तसेच रमेश,सुरेश व शाहू हे तीनही मुलगे पोलीस खात्यातून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले. धाकटा मुलगा अनंत मुंबईतील एका कंपनीत कार्यरत आहे. तर मधला मुलगा चंद्रकांत यांनी काही वर्ष मुंबईत नोकरी करून नंतर गावची शेती सांभाळली. श्रीमती चंद्रभागा देसाई यांच्या शेवटच्या काळात त्यांची सेवा ही चंद्रकांत यांनीच केली. तिच्या मंदाकिनी,सुनंदा,रजनी या तिन्ही मुली आज साजरी आनंदाने संसार करतात. श्रीमती चंद्रभागा देसाई यांचा गोतावळा फारच मोठा आहे. मुले, मुली, सुना, जावई, ३१ नातवंडे, नात-सुना, नात-जावई, २५ पतवंडे आणि इतर सख्खे-चुलत अशी बरीच माणसे म्हणजे तिचे हे ‘गोकुळच’. गावातल्यांची, वाडीतल्यांची ती लाडकी ‘काकी’ होती.
तिची बुद्धिमत्ता व स्मरणशक्ती फारच तल्लक होती. आज शंभरी पार केल्यानंतरही आपल्या मुलांची, नातवंडांची,पतवंडांची नावे आणि आठवणी ती आवडीने सांगत असे. आणखी एक गोष्ट म्हणजे तिला पान -सुपारी खाण्याची फारच आवड होती. कधी मुले-नातवंडे तिला भेटायला आली तर ती माझ्यासाठी खाऊ नको पान-सुपारी आणलीत का? असे आवर्जून विचारत असे.
या माऊलीच्या सुखी जीवनाचे रहस्य म्हणजे, तिने कधीही कोणाकडून कसलीही अपेक्षा ठेवली नाही किंवा कुणालाही कधी टाकून बोलली नाही. कमीत कमी गरज हे तिच्या आनंदी जीवनाचे रहस्य आहे. आज तिच्या जाण्याने देसाई परिवारात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर्व कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी ही ‘नाळ’ आज कालवंश झाली. तिने कधीच जुन्या प्रथा,रुढी, नवीन पिढीवर लादल्या नाहीत किंवा नवीन गोष्टींचा तिरस्कारही केला नाही. नेहमी स्वतःमध्ये बदल घडवून निसर्गाच्या समायोजन नियमाला न्याय दिला. शेवटपर्यंत आत्मनिर्भर राहून तिने कोणालाही त्रास दिला नाही. कोणत्याही प्रकारचा आजार स्वतःला शिऊ दिला नाही आणि निरोगी,आरोग्यमय जीवन कसे जगावे याचा धडा शिकवून गेली.
तिच्या या संपूर्ण आयुष्यात तिला एक जीवाभावाची मैत्रिणी सुद्धा होती ती म्हणजे, श्रीमती सुमती विठ्ठल देसाई नात्याने तिची सून पण वयात फारसे अंतर नसल्यामुळे दोघींची अगदी घट्ट मैत्री होती. सुख-दुःखाच्या गप्पा-गोष्टी सांगण्यासाठी हक्काची मैत्रीण होती.
चंद्रभागा पर्वाकडे पाहताना, तिचा आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, कोणत्याही समस्येकडे सहज पाहणे, दुःखाचा देखावा न करणे, जीवन जगत पुढे जाणे, कशात स्वतःला गुंतून न ठेवणे, अति विचार न करणे, आपल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडणे, सगळ्यांवर समान प्रेम करणे, आदर करणे, आपुलकीने वागणे, पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे या सर्व गुणांमुळे हे पर्व सहजच पार पाडणारी श्रीमती चंद्रभागा देसाई दिगवळे गावात नंदनवन फुलवून वैकुंठात विलीन झाली. तिच्या या निर्मळ, पवित्र व तपस्वी आत्म्याला ईश्वर शांती देवो हीच देसाई कुटुंबीयांची प्रार्थना.
संकलन – श्री जनार्दन दाजी देसाई

error: Content is protected !!