खारेपाटण ज्युनियर कॉलेज येथे दुर्गा गौरव सन्मान सोहळा – २०२५ सपन्न

बचत गटाच्या सुमारे ६० महिलांनी केले यशस्वीरित्या प्लबिंग प्रशिक्षण पूर्ण
पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ,खारेपाटण व ज्ञानदा गुरुकुल पुणे आणि रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण पंचक्रोशीतील बचत गटातील महिलांसाठी प्लंबिंग टेक्निशियन कोर्स च्या विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन खारेपाटण ज्युनियर कॉलेज करण्यात आले होते. यामध्ये बचत गटांमधील सुमारे ६० महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन प्लंबिंग टेक्निशियन प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. या प्रशिक्षणार्थी महिलांच्या सन्मानार्थ दुर्गा गौरव सन्मान सोहळा – २०२५ चे खारेपाटण येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
प्लंबिंग टेक्निशियन प्रशिक्षण क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम पुणे येथील ज्ञानदा गुरुकुल संस्था व खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या सर्व प्रशिक्षित महिलांना प्लंबिंग टेक्निशन कोर्स प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी व त्यांचा विशेष सत्कार करण्याच्या उद्देशाने दुर्गा गौरव – २९२५ या सन्मान सोहळ्याचे आयोजन खारेपाटण हायस्कूल मधील चंद्रकांत पारीसा रायबागकर सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी कणकवली नायब तहसीलदार श्रीम. दिपाली पंडित, ज्ञानदा इन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पायपिंग टेक्नॉलॉजी पुणे या संस्थेचे अध्यक्ष श्री. अभय मठ, ज्ञानदा गुरुकुल पुणे या संस्थेचे संचालक श्री. मिलिंद डांगे, युवा उद्योजक व समाजसेवक श्री. रुपेश सावंत, श्री. सोमनाथ कुलकर्णी व श्री.अमित नाईक (मोबिलायझेशन ऑफिसर ज्ञानदा गुरुकुल पुणे) श्रीमती योगिता ढाणे (शाखा व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया खारेपाटण) खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री. भाऊ राणे सचिव श्री. महेश कोळसुलकर विश्वस्त श्री. विजय देसाई ,रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष श्री. दयानंद कोकाटे, खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज प्राचार्य श्री. संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत सर्व शिक्षक वर्ग व पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित महिलांनी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण संस्था व ज्ञानदा गुरुकुल पुणे यांच्या विशेष उपक्रम बद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ खारेपाटण च्या माध्यमातून तीनही बचत गटांना प्लंबिंग किट चे वाटप मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष रोटेरियन श्री. दयानंद कोकाटे सेक्रेटरी रोटेरियन श्री. अजय गुरसाळे खजिनदार रोटेरियन श्रीमती. सारिका महिंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंचक्रोशीतील महिलांना प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वरुणकर सर व आभार प्रदर्शन सौ. शर्मिन काझी मॅडम यांनी मानले.





