विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच आपले ध्येय निश्चित केले पाहिजे – नयोमी साटम,अप्पर पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग

खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज शालेय विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असल्या कारणाने विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिक्षण घेत असतानाच आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक असून योग्य नियोजन व अचूक मार्गदर्शन घेतल्यास यश हमखास आपल्या पर्यंत चालून येते. असे भावपूर्ण उदगार सिंधूकन्या व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलिस अधीक्षक श्रीम. नयोमी साटम यांनी खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शालेय विद्यार्थी गुणगौरव बक्षीस समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले.
सन – २०२४- २५ या शैक्षणिक वर्षाचा शालेय बक्षीस वितरण समारंभ शेठ न. म. विद्यालय खारेपाटण मधील चंद्रकांत पारीसा रायबागकर सभागृहामध्ये नुकताच संपन्न झाला. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील ज्या विद्यार्थ्यांनी शालेय परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन केले अशा सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सिंधूकन्या कुमारी. नयोमी साटम IPS (अप्पर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग ) श्री. जयप्रकाश परब (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग) खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी शेठ न. म. विद्यालय खारेपाटण व ज्युनिअर कॉलेज मधील शालेय व बोर्ड परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.
यावेळी बोलताना कुमारी नयोमी साटम मॅडम यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना एमपीएससी व यूपीएससी परीक्षा बाबत मार्गदर्शन केले. शालेय जीवनातच ध्येय निश्चिती करणे किती आवश्यक आहे याचे महत्त्व कुमारी नायोमी साटम मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.तर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जयप्रकाश परब यांनीही उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. वयाच्या २३व्या वर्षी आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या कुमारी नयोमी साटम मॅडम यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे मत प्राचार्य श्री. संजय सानप यांनी यावेळी आपल्या मनोगतामधून व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. भाऊ राणे, सचिव श्री. महेश कोळसुलकर विश्वस्त श्री. कांबळे सर प्राचार्य श्री. संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. अमृते मॅडम, श्रीम. सारिका महिंद्रे मॅडम श्री. कानागल सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन पाताडे मॅडम यांनी केले.

error: Content is protected !!