देवा भाऊ, आमचे स्त्रीधन सुरक्षित करा !

मच्छीमार भगिनींकडून मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदेंना प्रतीकात्मक रक्षाबंधन
मालवण येथील सोने तारण अफरातफर प्रकरणातील पीडित मच्छीमार महिलांनी रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतीकात्मक रक्षाबंधन करून आपल्या स्त्रीधनाची सुरक्षितता आणि न्यायासाठी साकडे घातले.
एका वित्तीय संस्थेतील सोने तारण गैरव्यवहारप्रकरणी मच्छीमार भगिनींच्या वतीने मालवण पोलीस ठाण्यात सामूहिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील सुमारे १२५ पीडितांचे जबाब पूर्ण झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री कार्यालयाकडेही करण्यात आली आहे.
२८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर तक्रार निवारण मंच कार्यालय, मालवण येथे मच्छीमार भगिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘देवा भाऊ’ तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाऊ मानून प्रतीकात्मक रक्षाबंधन केले. यावेळी ‘ओवाळणी म्हणून आमचे स्त्रीधन सुरक्षित करा’ अशी भावनिक मागणी करण्यात आली. ‘भाऊ म्हणून तुमच्यावर विश्वास आहे, आम्हाला न्याय मिळवून द्या,’ अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या.
त्यानंतर मालवण पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक पंडित पाटील व श्री. खाडे यांनाही महिलांनी रक्षाबंधन केले. प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून पीडित महिलांना त्यांचे अडकलेले स्त्रीधन मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
या वेळी सोने तारण फसवणूक तक्रार निवारण मंच, मालवण’च्या सिया धुरी, कविता मोंडकर, माधुरी प्रभू, अल्का कुबल, सविता धुरी, दीपिका घारे, ममता कुबल, जान्हवी लोणे आणि गीतांजली पवार यांच्यासह मच्छीमार भगिनी उपस्थित होत्या.






