पाचव्या समाज साहित्य भाषा विचार संमेलनच्या अध्यक्षपदी भाषा अभ्यासक डॉ. दीपक पवार

सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठान आणि सहयोग संस्था वसईतर्फे वसई येथे संमेलनाचे आयोजन
समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि सहयोग संस्था वसई यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी काळात वसई येथे आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या समाज साहित्य भाषा विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्रा. डॉ. दीपक पवार यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती सहयोग संस्थेचे संचालक कवी सायमन मार्टिन आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, कार्यवाह सुरेश बिले यांनी दिली.
ज्येष्ठ इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर आणि कथाकार नाटककार जयंत पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ समाज साहित्य प्रतिष्ठान ही चळवळ कार्यरत असून यावर्षीचे पाचवे समाज साहित्य भाषा विचार संमेलन नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्याने वसई येथे आयोजित करण्यात आले आहे. समाज असतो म्हणून साहित्याची निर्मिती होते तसेच भाषा आणि विचार हा साहित्याचा आणि समाजाचा महत्त्वाचा गाभा असतो. या संकल्पनेच्या केंद्रस्थानी ठेवून हे संमेलन दरवर्षी आयोजित केले जाते. यापूर्वीची चारही संमेलने सिंधुदुर्ग आणि मुंबई येथे आयोजित करण्यात आली. सिंधुदुर्ग कोकण बरोबर महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, भाषेच्या अभ्यासकांना जोडून घेण्यासाठी ही संमेलने विविध भागात आयोजित केली जातात. यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिकांना संमेलनाचा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. मात्र साहित्यकृतीही व्यवस्थेतील हस्तक्षेप असते असं मानून सध्याच्या भाषिक राजकारणाच्या पार्श्वभूमी भाषा अभ्यासक दीपक पवार यांची पाचव्या समाज साहित्य भाषा विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.समाज साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक अजय कांडर, अध्यक्ष मधुकर मातोंडकर, मुख्य कार्यवाह सुरेश बिले, कोषाध्यक्ष प्रमिता तांबे, विश्वस्त संजीवनी पाटील, नीलम यादव, सहकार्यवाह प्रियदर्शनी पारकर, ॲड. मेघना सावंत, डॉ. योगिता राजकर, मनीषा शिरटावले, हरिचंद्र भिसे, सफरअली इसफ आदींच्या उपस्थित संस्थेची ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी एकमताने दीपक पवार यांच्या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडीचा निर्णय घेण्यात आला. दीपक पवार सध्या महाराष्ट्रातील भाषेच्या संदर्भात बहुचर्चित नाव असून गेली 24 वर्ष ते अध्यापनक्षेत्रात कार्यरत आहेत. आपण कोणत्याही भाषेचे दुश्मन नसतो तरी आपली भाषा आपणच जपायला हवी आणि जगण्याच्या नेहमीच्या व्यवहारात तिचा प्रकर्षाने वापर व्हायला हवा. त्याचबरोबर आपल्या भाषेतूनच आपण शिक्षण घ्यायला हवे असा आग्रह धरून ते भाषा चळवळ राबवत असतात.





