भजन स्पर्धेतील कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे सातत्य कौतुकास्पद – दत्ता सामंत

‘कुडाळेश्वर’च्या सुवर्णमहोत्सवी भजन स्पर्धेचा शानदार शुभारंभ
जिल्हाभरातून तीस भजन मंडळे सहभागी
कुडाळेश्वर उत्सव मंडळाने गेली पन्नास वर्षे भजनस्पर्धा घेण्यात टिकवून ठेवलेले सातत्य कौतुकास्पद आहे, अशा शब्दात शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी कुडाळेश्वर मंडळाचे कौतुक केले. श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित पन्नासाव्या कै. ऍड. अभय देसाई स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी कुडाळेश्वर मंदिर येथे झाला, त्यावेळी श्री. सामंत बोलत होते. दोन फेऱ्यांमध्ये होणाऱ्या या भजन स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून तीस भजनी मंडळे सहभागी झाली आहेत.
श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ यांच्या मार्फत दरवर्षी नवरात्रोत्सवात कै. ऍड. अभय देसाई स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा या भजन स्पर्धेचे पन्नासावे वर्ष आहे. त्यामुळे यंदाची भजन स्पर्धा आणि स्पर्धेचा उदघाटन सोहळा काहीसा अगाळावेगळा होईल याकडे मंडळाने लक्ष दिले आहेत. त्याप्रमाणे श्री देव कुडाळेश्वर मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्री उत्सव असल्याने मंदिरात देवीची देखील प्रतिष्ठपना करण्यात आली आहे. व्यासपीठावर पांडुरंगाची मूर्ती देखील विठू नामाचा गजर करत स्थापन करण्यात आली. गेल्या पन्नास वर्षात मंडळाचे जे कार्यकर्ते दिवंगत झाले त्यांना देखील एका अभंगातून आदरांजली वाहण्यात आली. या सगळ्या वातावरणात सोमवारी सायंकाळी या सुवर्णमहोत्सवी भजन स्पर्धेचा उदघाटन सोहळा संपन्न झाला.
या उदघाटन सोहळ्यापूर्वी पखवाज वादन क्षेत्रातील गुरु माउली आनंद मोर्ये आणि त्यांच्या जिल्हाभरातील साठ शिष्यानी पखवाजवादन करून उपस्थित भजन रसिकांची मने जिंकली. त्यानंतर उदघाटन सोहळा संपन्न झाला. व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख दत्त सामंत, संजय पडते, अरविंद शिरसाट, राहुल पाटणकर, अमेय देसाई, विलास कुडाळकर, अरविंद करलकर, विनायक राणे, नगरसेवक विलास कुडाळकर, श्रुती वर्दम, परीक्षक शहाजहान शेख, संजय दळवी, किशोर काणेकर उपस्थित होते. दत्ता सामंत यांच्यासह या मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून या सुवर्णमहोत्सवी भजन स्पर्धेचे उदघाटन झाले.
यावेळी बोलताना दत्ता सामंत यांनी कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. . एखादी स्पर्धा सतत पन्नास वर्ष सुरु ठेवणे सोपी गोष्ट नाही. या मंडळाचे नाव राज्यात पोहोचलेले आहे. आज देखील पखवाजवादानाचा सुंदर कार्यक्रम बघता आला. कुडाळेश्वर मंडळाचा आदर्श घेऊन आपण घुमडे गावामध्ये कार्यक्रम करत असल्याचे दत्ता सामंत यांनी सांगितले. या मंडळासाठी योग्य ते सहकार्य आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून करण्यात येईल असेही श्री. सामंत म्हणाले. कार्यक्रमाचे परीक्षक शहाजहान शेख यांनी देखील आपल्या मनोगतातून मंडळाला शुभेच्छा दिल्या आणि मंडळाचे कौतुक केले.
यावेळी महेश कुडाळकर, श्रीकृष्ण कुंटे, सुरेश राऊळ, सुशांत राऊळ, केदार राऊळ, नंदू कुंटे आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत किशोर काणेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश कुडाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले. कार्यक्रमाला भजन प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धीत तीस भजन मंडळे सहभागी झाली असून दोन फेऱ्यात हि स्पर्धा घेण्यात येणार आहे. उदघाटन सोहळ्यानंतर सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ, तुळस यांचे भजन सादर झाले.





