कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता शुभम सुरेश दुडये यांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर…

कणकवली, सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानक रस्ते काँक्रीटीकरण व सुशोभीकरण व वैभववाडी नापणे येथील महाराष्ट्र राज्यातील पहिला काचेचा पूल बनवण्यामध्ये योगदान महत्वाचे…

कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता शुभम सुरेश दुडये यांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांचा 15 सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी अभियंतादिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र प्रधान करण्यात येते. तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन २०२४-२०२५ या कालावधीसाठी देण्यात येणारे पुरस्कार शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले. यामध्ये विशेष म्हणजे राज्यातील एकूण 20 स्थापत्य तांत्रिक संवर्गातील जाहीर पुरस्कार मधील सा बां मंडळ रत्नागिरी व सिंधुदुर्ग यातील मिळून 7 अधिकारी / कर्मचारी यांना पुरस्कार घोषित झाला आहे. त्यात सिंधुदुर्ग जिल्यात कार्यरत असलेले 5 कर्मचारी असून सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीयांच्या अधिनिस्त उपविभाग वैभववाडी येथील कनिष्ठ अभियंता शुभम सुरेश दुडये यांच्या नावाचा समावेश आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांच्याकडून करण्यात आलेल्या कणकवली रेल्वेस्थानक व सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक तसेच वैभववाडी तालुक्यातील नापणे येथे उभारलेला महाराष्ट्र राज्यातील पहिला काचेचा पूल उभारण्यात दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या शुभम दुड्ये यांना हा पुरस्कार मिळाल्याने कणकवली विभागातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

रत्नागिरी मंडळातील अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग सा बां मंडळातील 5 अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार मिळाला असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नांव राज्य स्तरावर पुन्हा अधोरेखित झाले आहे. सा बां उपविभाग वैभववाडी येथील उपविभागीय अधिकारी विनायक जोशी यांच्या सोबत नेहमी कार्यतत्पर असणारे शुभम दुडये यांनी भुईबावडा – गगनबावडा घाटामधील दगडांवर प्राण्यांची चित्रे काढून घेऊन पर्यटकांना आपल्या पर्यटन जिल्ह्यामध्ये स्वागत करण्यासाठी वेगळी संकल्पना दिली. सा बां विभागाच्या नियमित कामापेक्षा वेगळ्या केलेल्या कामाबद्दल तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी फेसबुक पोस्ट द्वारे दखल घेतली होती. कणकवली व सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक परिसरातील सुशोभीकरण व नूतनीकरण कामे कमी वेळेत दर्जेदार पद्धतीने करून घेण्याची जबाबदारी घेतलेल्या तत्कालीन कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या टीम मध्ये कनिष्ठ अभियंता दुड्ये यांनी खूप मेहनत घेतली होती. विविध रस्ते, पूल तसेच इमारती यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत करण्यात येतात तसेच इमारती, पुलांची संकल्पना तयार करुन व इतर माध्यमांचा म्हणजे संगणकाचा उपयोग करुन संकल्पनाचित्रे बनविणे सार्वजनिक इमारतींच्या विद्युतीकरणाची कामे करणे व प्रकल्प राबविताना जे तांत्रिक कौशल्य पणाला लागते आणि ज्यामुळे अभियंत्यांची सेवा समाजाला भविष्यात फायद्याची ठरते, अशा अभियंत्यांचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य लक्षात घेऊन त्यांचा वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या कारकिर्दीत राज्यातून निवडलेल्या 20 स्थापत्य तांत्रिक संवर्ग पैकी सिंधुदुर्ग जिल्यातील सा बां विभागातील एकाच वेळी 5 तांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांना असा पुरस्कार मिळाला असल्यामुळे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

error: Content is protected !!