खारेपाटण प्रा. आ. केंद्रात एम बी बी एस डॉक्टर हजर

डॉ. सुरज कुरणे यांचे ग्रामस्थांनी केले स्वागत
ग्रामस्थांच्या मागणीला यश
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला एम बी बी एस डॉक्टर मिळावा म्हणून ग्रामस्थानी केलेल्या मागणी आंदोलनाला अखेर यश मिळाले असून येथील प्रा. आ. केंद्रात नुकतेच एम बी बी एस वैद्यकीय पदवी धारक असलेले डॉ. सूरज बापू कुरणे हे वैद्यकीय अधिकारी म्हणून हजर झाले असून खारेपाटण ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सौ प्राची ईसवलकर यांनी आज मंगळवारी त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी खारेपाटण उपसरपंच श्री महेंद्र गुरव,माजी सरपंच व भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रामकांत राऊत, शिवसेना कणकवली तालुका प्रमुख श्री मंगेश गुरव, शिवसेना उबाठा कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री संतोष पाटणकर,माजी उपसरपंच श्री इस्माईल मुकादम, ग्रा.पं.सदस्य श्री जयदीप देसाई, किरण कर्ले,श्री सुरेश गुरव, खारेपाटण प्रा.आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम आदी पदाधिकारी व ग्रामस्थ यांसह आरोग्य कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
खारेपाटण प्रा.आ.केंद्र येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी,देवगड यांसह रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील गावामध
नागरिक आरोग्य तपासणी करीत येत असून मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर अगदी जवळ असलेले हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव प्रा.आ.केंद्र असल्यामुळे येथे अपघात ग्रस्त रुग्ण रात्री अपरात्री केव्हाही येत असतात.तसेच ग्रामीण भागातील सर्पदंश झालेले रुग्ण देखील येथे उपचारासाठी येत असल्याने खारेपाटण प्रा.आ.केंद्रासाठी एम बी बी एस कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्याची गरज होती.याकरिता ग्रामस्थानी गेल्या आठवड्यातच शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आपली मागणी सरकारच्या व संबधीत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
या सर्व आरोग्य विषयी बाबीची व ग्रामस्थांच्या मागणीची गभिर्याने दाखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.इंगवले यांनी खारेपाटण प्रा.आ.केंद्रासाठी एम बी बी एस डॉक्टर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे देखील खारेपाटण ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.





