‘कोटेश्वर’ शाळेसाठी सर्वतोपरी मदत करणार – आनंद ठाकूर

हरकुळ बु. च्या कोटेश्वर शाळेत माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद शाळा हरकुळ बुद्रुक कोटेश्वर या शाळेचा माजी विद्यार्थी मेळावा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आदेशाप्रमाणे आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या निमित्ताने सरपंच आनंद ठाकूर यांनी शाळेच्या विकासासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि माजी विद्यार्थी या नात्याने सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी हरकुळ बुद्रुक गावचे सरपंच आनंद ठाकूर आणि प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश राजेंद्र ताम्हाणेकर आणि उच्चपदस्थ ग्रामस्थ आत्माराम सिताराम गोसावी उपस्थित होते.
सोलापूर न्यायालयाचे न्यायाधीश राजेंद्र ताम्हाणेकर यांनी जिल्हा परिषद शाळेतील घटत्या पटसंख्येबाबत वास्तवदर्शी विचार मांडले आणि आर्थिक मदत जाहीर केली. त्याचप्रमाणे आत्माराम गोसावी यांनी आपल्या बालपणातील आठवणींचा उजाळा देऊन शाळेला सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले .
या मेळाव्यामध्ये डॉक्टर अनिल ठाकूर. ल. गो . सामंत विद्यालयाचे माजी चेअरमन ओमप्रकाश ताम्हाणेकर, प्रसिद्ध व्यावसायिक चांद शेख, संतोष भाट, ग्रामपंचायत सदस्य च. ना परब, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे भालचंद्र मराठे यांनीही मनोगत व्यक्त केले. या सर्वानीच इमारत निर्लेखनास जिल्हा परिषदेकडून होणाऱ्या विलंबाबाबत खेद व्यक्त केला.
कार्यक्रमाला माजी विद्याथ्यांसह जिल्हा परिषद शाळा हरकुळ बुद्रुक कोटेश्वर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. रिया चव्हाण , पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी सन २०१९-२०२० मध्ये देणगी दिलेल्या आत्माराम गोसावी, प्रकाश चव्हाण, अमित खोचरे, सुधीर खोचरे, सुनील अपराज, चंद्रकांत महाडेश्वर, दीपक तिवरेकर, अशोक गणपत परब त्या दात्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. हर्षदा हरेश सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश पाटील सर यांनी केले

error: Content is protected !!