सिंधुदुर्गात पहिल्यांदाच आढळली कुख्यात आफ्रिकन गोगलगाय

रॅपिड रेस्क्यू टीमचे अनिल गावडे यांची माहिती

जगातील १०० सर्वात कुख्यात आक्रमक प्रजातींपैकी एक

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच आफ्रिकन स्नेल (Giant African Snail / Lissachatina fulica) आढळल्याची नोंद झाली आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात, वनपरिक्षेत्र कुडाळ रॅपिड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिल गावडे यांनी याबाबत माहिती दिली असुन जिल्ह्यातील ही पहिलीच नोंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आफ्रिकन स्नेल ही जगातील १०० सर्वात कुख्यात आक्रमक प्रजातींपैकी एक मानली जाते. ही साधारण १०-१५ सें.मी. पर्यंत वाढू शकते आणि जगातील सर्वांत मोठ्या स्थलांतरित गोगलगाईंपैकी ती एक आहे. कृषी, पर्यावरण आणि जैवविविधतेसाठी धोकादायक ठरणाऱ्या या प्रजातीच्या नियंत्रणासाठी स्थानिक प्रशासन, शेतकरी आणि नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे अनिल गावडे यांनी स्पष्ट केले आहे.
ही प्रजाती अत्यंत प्रजननक्षम असून एका वेळी १००–४०० अंडी घालते आणि वर्षाला अनेक वेळा अंडी देऊ शकते. माती, झाडे, शेतीमाल, वाहतूक साधने यांच्यामार्फत फार जलदगतीने ती सगळीकडे पसरते. एकदा नवी जागा मिळाल्यावर त्या ठिकाणी स्थानिक प्रजातींना बाहेर ढकलून स्वतःचं वर्चस्व निर्माण करते. विशेषतः पाने, कोवळी फांदी, फळे व मुळे यांवर हल्ला केल्याने पिकांतुन मिळणार एकुणच उत्पन्न ढासळण्याची दाट शक्यता असते.
महाराष्ट्रात यापूर्वी सांगली, नागपूर, चंद्रपूर, पुणे, औरंगाबाद व कोल्हापूर जिल्ह्यांत या प्रजातीची उपस्थिती नोंदली गेली आहे, ज्यात विशेषतः भात, ऊस आदी पिकांना मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच नोंद असुन फुलझाडे किंवा फळझाडे यांच्या वाहतुकी दरम्यान या प्रजातीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांमध्ये प्रवेश झाला असावा असं अनिल गावडे यांनी म्हटले आहे. या प्रजातीच्या प्रसाराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून सिंधुदुर्गतील हवामान या आक्रमक प्रजातीसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे भविष्यात या प्रजातीचा प्रसार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी, पर्यावरण आणि जैवविविधतेसाठी धोकादायक ठरणाऱ्या या प्रजातीच्या नियंत्रणासाठी स्थानिक प्रशासन, शेतकरी आणि नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे यावेळी अनिल गावडे यांनी स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!