बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या एम.एस्सी नर्सिंग महाविद्यालयास शासनाची मान्यता

सिंधुदुर्गातील पहिले एम. एस्सी.नर्सिंग महाविद्यालय : प्रवेश प्रक्रिया सुरु
कुडाळ : कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग या संस्थेत सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षापासून एम.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाला शासनाची मान्यता मिळाली आहे. अशा प्रकारचे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पहिले एम.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय आहे. अशी माहिती महाविद्यालयातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार एम.एस्सी नर्सिंग अभ्यसक्रमाच्या सामाजिक आरोग्य परिचर्या (कम्युनिटी हेल्थ नर्सिंग), वैद्यकीय-शल्यक्रिया परिचर्या (मेडिकल सर्जिकल नर्सिंग – क्रिटिकल केअर नर्सिंग), मानसिक आरोग्य परिचर्या (मेंटल हेल्थ नर्सिंग), प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्र (ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलोजीकल नर्सिंग) आणि बाल आरोग्य परिचर्या (चाइल्ड हेल्थ नर्सिंग) अशा पाच विभागाना मान्यता देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे एम. एस्सी नर्सिंग प्रवेशासाठी अनेक गैरसोईंचा सामना करीत सिंधुदुर्गातील बी.एस्सी नर्सिंग पास झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्ह्याबाहेर जावे लागत असे. बी.एस्सी नर्सिंग नंतर मनात असूनही पदव्युत्तर पदवी (एम. एस्सी नर्सिंग) शिक्षण घेता येत नव्हते ही विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी महाराष्ट्र शासनाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री आयुक्त राजीव निवतकर यांच्या सहकार्यामुळे एम. एस्सी. नर्सिंगची सिंधुदुर्गामध्ये सोय उपलब्ध करून दिली आहे.याबद्दल बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
एम.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या मर्यादित जागांसाठी शासनाची मान्यता मिळाली असून बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये एम. एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर प्रवेश प्रक्रीयेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होवून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या सौ. कल्पना भंडारी आणि बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले आहे
सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये एम. एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थी, पालकवर्ग, शिक्षणप्रेमींकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.





