पावशी येथील बेल नदी पुलावरील भगदाड दुरुस्त करण्याचे काम सुरू

मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथील बेल नदीच्या पुलावर पडलेले भगदाड दुरुस्त करण्याचे काम अखेर युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. गोव्याच्या दिशेने असलेल्या मार्गिकेवर असलेल्या भगदाडामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा धोका निर्माण झाला होता.
काही महिन्यांपूर्वी देखील बेलनदीच्या या पुलावर भगदाड पडले होते. त्यावेळी तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती. त्यांनतर गेल्या दोन दिवसात याठिकाणी असलेले भगदाड अजून मोठे झाले आणि पुलासह वाहनधारकांना धोका निर्माण झाला. आज २१ ऑगस्ट रोजी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, यावेळी दर्जेदार काम होईल अशी अपेक्षा स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
गणेशोत्सव तोंडावर आहे. चाकरमानी रात्री-अपरात्री या मार्गावरून प्रवास करताहेत. पण मुंबई-गोवा महामार्गाची सद्यस्थिती अत्यंत बिकट आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासाचा वेळ वाढत असून, अपघातांचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे, चतुर्थीपूर्वी हे सर्व खड्डे भरून रस्ता सुस्थितीत आणला जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रवासाला येणारे अडथळे आणि संभाव्य धोके यामुळे नागरिक चिंतेत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन, गणेश चतुर्थीपूर्वी महामार्ग सुस्थितीत आणावा, अशी मागणी जनसामान्यातून जोर धरत आहे.





