कायदा आणि सुव्यवस्था राखून गणेशोत्सव साजरा करा – नयोमी साटम

कुडाळमध्ये गणेशोत्सव नियोजन बैठक
बैठकीत महावितरण, सा.बां, महामार्ग विभाग ‘टार्गेट’
गणेशोत्सव हा आपल्या जिल्ह्याचा सर्वात महत्वाचा सण आहे. त्यामध्ये कोणतेही हेवेदावे न करता कायदा आणि सुव्यवस्था राखणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. हा सण सर्वानी उत्साहाने पण कायदा आणि सुवव्यवस्था राखूनच साजरा करावा असे आवाहन सिंधुदुर्गच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी केले. कुडाळ तालुक्यातील गणेशोत्सव काळातील नियोजनविषयी बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या बैठकीत उपस्थित नागरिकांनी आपल्या समस्या मांडताना महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग विभाग याना टार्गेट केले.
गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे. त्या निमित्ताने विविध विभागांनी केलेल्या नियोजनाचा आढाव घेण्यासाठी आणि गणेशोत्सव व्यवस्थित आणि सुरळीत साजरा होण्यासाठी येथील मराठा समाज हॉल मध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. कांबळे, तहसीलदार वीरसिंग वसावे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, नगर पंचायतचे मुख्याधिकारी अरविंद नातू, बीडीओ प्रफुल्ल वालावलकर, महावितरणचे अधिकारी, सा.बा.चे श्री. बामणे, महामार्ग विभागाचे श्री. साळुंखे, एमआयडीसीचे अविनाश रेवंडकर, एसटीचे रोहित नाईक, कोकण रेल्वेचे श्री. नाडकर्णी, वन विभागाचे श्री. कुंभार उपस्थित होते.
सुरुवातील पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी उपस्थितांना बैठकीचा उद्देश समजावून सांगितला. त्यांनतर सर्व विभागांनी कसे नियोजन केले आहे याचा आढावा घेण्यात आल्या. त्यामध्ये रस्त्यांवर पडलेले खड्डे, वारंवार होणार खंडित वीजपुरवठा, कोकण रेल्वे कडील रस्ता, गणेश घाट, वाहतूक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, सार्वजनिक गणेशोत्सवात घ्यावयाची काळजी, कुडाळ शहरातील वाहतूक नियोजन आणि बाजारपेठ नियोजन, भंगसाळ नदीत असलेल्या मगरी, हायवेवर वारंवार पडणारे खड्डे, पिंगुळी म्हापसेकर तिठ्यावरील वाहतूक कोंडी, रिक्षा चालकांचे जवळचे भाडे नाकारणे, रेल्वे स्थानक रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करणे, अशा गोष्टींवर चर्चा करण्यात आली. विशेतः महावितरणच्या खंडित वीज पुरवठ्यावर नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. फोन केला तर तो न उचलणे, रेंज नसणे, वारंवार वीज जाणे या गोष्टींकडे नागरिकांनी लक्ष वेधले.
सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी सर्वाना मार्गदर्शन करून गणेशोत्सव कायदा आणि सुव्यवस्था राखून साजरा करण्याचे आवाहन सर्वाना केले. कोणाची काही तक्रार असेल तर पोलिसांच्या ११२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी देखील आढावा घेतला. अधिकऱ्यानी आपण नवीन असल्याची कारणे न देता जनतेला सेवा द्या. कोणाचे रस्ते कोणाला माहित नाही हि शोकांतिका असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. रस्त्यावरचे खड्डे ताबडतोब बुजविण्यात यावेत. पिंगुळी तिठ्यावरच्या वाहतूक समस्येवर मार्ग काढा. एमआयडीसी मध्ये सुट्टीच्या काळात पोलिसांची गस्त आढावा. मगरी असतील तर गणेश घाटावर वनविभागाचा प्रतिनिधी ठेवावा. रिक्षा व्यावसायिकांनी योग्य भाडे आकारावे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळीनी सीसीटीव्हीची यंत्रणा बसवावी अशा सूचना तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केल्या.
यावेळी प्रसाद शिरसाट, श्रीराम शिरसाट, संदेश पडते, श्री. पाटकर, नगरसेविका सौ. श्रेया गवंडे, आफरीन करोल यांनी प्रश्न मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले. या बैठकीला नगरसेवक मंदार शिरसाट, नयना मांजरेकर, श्रेया गवंडे, आफरीन करोल, वीज ग्राहक संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री पाटकर, व्यापारी संघाचे श्रीराम शिरसाट, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, सर्व शासकीय यंत्रणांचे खातेप्रमुख, गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी, तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटिल, व्यापारी संघटना पदाधिकारी, रिक्षा युनियन पदाधिकारी आदी उपस्थित होते.





