सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महसूलच्या कामाचा पुरता बोजवारा!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा शासकीय कामापुरता मर्यादित राहू नये
माजी आमदार परशुराम उपरकर यांचा टोला
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील महसूल कामकाज पद्धतीचा पुरता बोजवारा उडालेला आहे. मुदत संपल्यानंतर झालेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमधील घोळ, कासार्डे मधील अवैध सिलिका उत्खनन, जिल्ह्यातील वाळू माफियांचे वाढते प्रताप, तसेच वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली व दोडामार्ग तालुक्यातील सासोली या ठिकाणी बोगस शेतकरी दाखले देऊन झालेले जमिनींचे व्यवहार आदीबाबत महसूल मंत्री लक्ष घालणार आहेत का? केवळ सिंधुदुर्गात येऊन खाजगी दौरा केला आणि बैठक घेऊन गेले एवढ्या पुरताच हा दौरा मर्यादित राहू नये अशी अपेक्षा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी व्यक्त केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. उपरकर म्हणतात, महसूल विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठीची मुदत 30 मे पर्यंत होती. मात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या 3 जून रोजी ऑनलाइन सह्या करून करण्यात आल्या आहेत. खनि कर्म विभागातील अशोक पोळ हा सहाय्यक महसूल अधिकारी एकाच ठिकाणी नऊ वर्ष आहे सदर कर्मचारी बदलीस पात्र असतानाही आर्थिक व्यवहार करून त्याला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. या बदल्यांमध्ये असलेल्या घोळाबाबत आम्ही लक्ष वेधलेले होते. मात्र यात कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील कासार्डे मध्ये मोठ्या प्रमाणात सिलिका वाळूची तस्करी केली जाते. महसूल यंत्रणेच्या निगराणीखाली अवैध पद्धतीने कोट्यावधीची सिलिका उत्खनन व वाहतूक होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. याबाबत आम्ही प्रत्यक्ष पुराव्यासहित तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. जिल्ह्यात वाळू व्यवसायाची ही तीच स्थिती आहे. जिल्ह्यात वाळू बाबत लिलाव झालेले नसताना अवैधरित्या वाळूचे वाहतूक, उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दोन दिवसापूर्वीच कुडाळ तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रकार झाला होता. असे प्रकार रोखण्यासाठी महसूल मंत्री या नात्याने श्री.बावनकुळे पावले उचलणार आहेत का? असा सवाल श्री उपरकर यांनी केला आहे
सिंधुदुर्गमध्ये परराज्यातील, परप्रांतातील लोक मोठ्या प्रमाणात बोगस दाखल्यांच्या आधारे जमिनी खरेदी करतात. या जमिनी खरेदी करताना स्थानिक दलाल हाताशी धरून सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्रास दिला जातो. वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली येथे व दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे अशाच प्रकारे बोगस शेतकरी दाखल्याच्या आधारे झालेले जमिनीचे खरेदी व्यवहार आम्ही उघड केले आहेत. मात्र महसूल यंत्रणा त्याबाबत कोणताही निर्णय घेत नाही. जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले महसूल मंत्री या साऱ्याकडे लक्ष देऊन जिल्हावासीयांना न्याय देणार आहेत का? अन्यथा त्यांचा दौरा हा जिल्ह्यात येऊन मासे, मटण खाऊन गेले एवढ्या पुरताच मर्यादित राहील. जिल्हा वाशियाना त्यांच्याकडून कोणताही न्याय मिळणार नाही. त्यामुळे याप्रकरणी महसूलमंत्र्यांनी लक्ष घालून या सर्व विषयांमध्ये योग्य कारवाई करावी अशी मागणी श्री. उपरकर यांनी केली आहे.





