न्यायालयाच्या फसवणूक प्रकरणी संशयिताला जामीन

कुडाळ : मयत भावाच्या नावाने खोटे शपथपत्र तयार करून, खनिज अधिनियम कलम २१ नुसार जप्त करण्यात आलेला डंपर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी रुपेश रमेश सावंत (वय ३४, रा.तळवडे, ता.सावंतवाडी) याला कुडाळ न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत दर मंगळवारी न्यायालयात हजर राहण्याची अटही न्यायालयाने घातली आहे.
या प्रकरणी आरोपी रुपेश सावंत याच्यावर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने आपल्या मयत भावाच्या नावाने खोटे शपथपत्र तयार करून त्यावर बनावट स्वाक्षरी केली. त्यानंतर, हे बनावट कागदपत्र कुडाळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सादर करून जप्त करण्यात आलेले वाहन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत न्यायालयाची फसवणूक केली होती.
याच गुन्ह्याखाली ३० जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, कुडाळ पोलीसांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र,आरोपीतर्फे वकील राजीव बिले, सुनील मालवणकर, दत्ताराम बिले, हेमांगी वऱ्हाडकर यांनी प्रभावी युक्तिवाद करत तपास कामातील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यामुळे न्यायालयाने संशयित आरोपीला जामीन मंजूर करण्याचा निर्णय दिला.

error: Content is protected !!