नवी कुर्ली गावासाठी तब्बल 2 कोटी 43 लाख 61 हजारांचा निधी मंजूर

प्रकल्पग्रस्त समितीच्या पाठपुराव्याला यश
कार्याध्यक्ष हरेश पाटील व अध्यक्ष रवींद्र नावळे यांचा गेली अनेक वर्ष सातत्याने पाठपुरावा
देवधर मध्यम पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत विस्थापित होऊन पुनर्वसन झालेल्या नवीन कुर्ली गावातील तब्बल 2 कोटी 43 लाख 61 हजार 642 रुपये निधीच्या विकासकामांना दक्षिण कोकण पाटबंधारे विकास मंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त समितीच्या यशस्वी पाठपुराव्याने तब्बल 30 वर्षानंतर यश आले आहे. नवीन कुर्ली वसाहत गावात या निधीतून 7 नागरी सुविधांची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी नवीन कुर्ली वसाहत समितीचे कार्याध्यक्ष हरेश पाटील व अध्यक्ष रविंद्र नवाळे यांनी मोठा पाठपुरावा केला आहे. नवीन कुर्ली पुनर्वसन गावठानामध्ये तत्कालीन पुनर्वसन अधिनियमानुसार 13 नागरी सुविधाची कामे करण्यात आली होती. नागरी सुविधांची कामे करुन सुमारे 30 वर्षांचा कालावधी लोटला असल्यामुळे नागरी सुविधांची कामे अतिशय जीर्ण व कालबाह्य झालेली आहेत. शिवाय त्यातीलच काही कामे अद्याप अपूर्णावस्थेत आहेत, त्यामुळे सदर नागरी सुविधांच्या कामांची नव्याने अंदाज पत्रके करुन तात्काळ कामे हाती घेण्यात यावीत. याबाबत नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त समिती यांनी मागील तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. अखेर शासन दरबारी दाद मागण्यासाठी दिनांक 15 ऑगस्ट, 2024 रोजी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयासमोर नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त समिती (रजि.) यांच्यावतीने बेमुदत साखळी उपोषण छेडण्यात आले. या उपोषणास नवीन कुर्ली गावातील अबालवृद्ध प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते. परिणामी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी नागरी सुविधाच्या कामांना दिनांक 21 ऑगस्ट, 2024 रोजी प्रापण सुचिमध्ये समाविष्ट करण्यासाठी नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त समिती (रजि.) च्यावतीने सुमारे तीनवर्षे पाठपुरावा करण्यात आला. यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री नितेश राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आग्रे, कणकवली विधानसभा अध्यक्ष संदेश पटेल या सर्वांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. अखेर सदर पाठपुराव्याला घवघवीत यश येऊन दिनांक 02 जुलै, 2025 रोजी कोकण पाटबंधारे विकास मंडळ, ठाणे यांनी खालील नागरी सुविधाच्या कामांचा प्रापण सूची मध्ये समावेश झाला. आणि गेल्या 30 वर्षापासून रखडलेल्या नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त नागरिकांना न्याय मिळाला आहे. मंजूर नागरी सुविधांची कामे –
1) पुनर्वसन गावठाण नवीन कुर्ली वसाहत येथील गटार दुरुस्ती करणे. – अंदाजपत्रकीय रक्कम 89,64,090 रुपये.
2) पुनर्वसन गावठाण नवीन कुर्ली वसाहत येथील अंतर्गत पोहोच रस्ता बनविणे. अंदाजपत्रकीय रक्कम 43,38,610 रुपये.
3) पुनर्वसन गावठाण नवीन कुर्ली वसाहत येथील समाज मंदिर दुरुस्त करणे. – अंदाजपत्रकीय रक्कम – 5,54,020 रुपये.
4) पुनर्वसन गावठाण नवीन कुर्ली वसाहत येथील पुर्ण प्राथमिक शाळा दुरुस्त करणे. अंदाजपत्रकीय रक्कम 52,12,333 रुपये.
5) पुनर्वसन गावठाण नवीन कुर्ली वसाहत येथे पाणीपुरवठा योजनेकरिता पर्यायी पंप बसविणे. अंदाजपत्रकीय रक्कम – 4.18.181 रुपये.
6) पुनर्वसन गावठाण नवीन कुर्ली वसाहत येथील पथदिवे बसविणे. – अंदाजपत्रकीय रक्कम 20,04,408 रुपये.
7) पुनर्वसन गावठाण नवीन कुर्ली वसाहत येथील ग्रामपंचायत कार्यलय बांधणे. 28,7000 रुपये. अंदाजपत्रकीय रक्कम.