कणकवलीत साकारला २० फुटी बकासुररुपी बगळ्याचा देखावा

श्री. देव काशीविश्वेश्वर मंदिराच्या हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजन

महापुरूष मित्रमंडळाचा देखावा ठरला लक्षवेधी

शहरातील काशीविश्वेश्वर मंदिरात प्रतिवार्षिक प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. शुक्रवारी रात्री महापुरुष मित्रमंडळाने बगळ्यारुपी ‘बकासुराचा वध ‘हा चलचित्ररथ देखावा काढला. हा देखावा लक्षवेधी ठरला. हा देखावा पाहिल्यानंतर अ बबब केवढो मोठो ह्यो बगळो, असे बोल उपस्थितांमधून उमटले.
काशीविश्वेश्वर मंदिरात गुरुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला.यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहामुळे शहरपरिसर भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे. गेले दोन दिवस विविध मंडळांनी दिंडी व चित्ररथ देखावे काढले. शुक्रवारी महापुरुष मित्रमंडळाने ढोल-तशांच्या गजरात काढलेला बगळ्यारुपी बकासुराचा वध हा चलचित्ररथ देखावा लक्षवेधी ठरला. हा देखावा पाहणाक्षणी अ बबब केवढो मोठो ह्यो बगळो, असे बोल उपस्थितांच्या सहजपणे तोंडातून उमटले. सप्ताहाचा पहिला दिवस तेलीआळी मित्रमंडळाने देखावा काढत हा दिवस जागवला. दुसऱ्या दिवशी महापुरुष मित्रमंडळाने बकासुराचा वध हा चलचित्र देखावा काढून सप्ताहामध्ये रंगत आणली. बाळकृष्णाला गिळंगृत केलेल्या बकासुर रुपी बगळ्याचा वध बाळकृष्ण करतो, यावर हा देखावा होता. हा देखावा पटवर्धन चौक ते काशीविश्वेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आला. हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये हा देखावा देखील चित्रीत केला.
शनिवारी रात्रौ पटकीदेवी मित्रमंडळा कडून हा दिवस जागवला गेला.
आज रविवार ३ ऑगस्ट ला ढालकाठी मित्रमंडळा कडून गजानन महाराज यांच्या वर आधारित देखावा काढला जाणार आहे. तर सोमवार ४ ऑगस्टला जुना मोटर स्टॅड मारुतीआळी, मंगळवार ५ ऑगस्टला बिजलीनगर मित्रमंडळ, बुधवार ६ ऑगस्टला आंंबेआळी मित्रमंडळ असे दिवस जागवले जाणार आहेत. यामुळे शहरात भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. गुरुवार ७ ऑगस्टला नगर प्रदक्षिणाने व महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होणार आहे.

error: Content is protected !!