कलाकार मानधन मंजुरीसाठी अधिकाऱ्याने घेतले दहा-दहा हजार रुपये-बुवा श्री.संतोष कानडे यांनी केला “पर्दाफाश”

अधिकाऱ्याने घेतलेले पैसे कलाकारांना मिळवून दिले परत.
कणकवलीत रंगले स्ट्रिंग ऑपरेशन.
कणकवली/प्रतिनिधी
राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन समिती च्या मार्फत जिल्ह्यातील वयोवृद्ध कलाकारांना शासनामार्फत मानधन दिले जाते.यासाठी कलाकारांचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत पूर्वी समाज कल्याण विभागाकडे वर्ग केले जात असत.पात्र उमेदवारांचे प्रस्ताव मंजूर करण्याचे काम संबंधित समितीच्या माध्यमातून होते.या विभागामध्ये काम करणाऱ्या एका शासकीय अधिकाऱ्याने हे प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी वरिष्ठांना पैसे द्यावे लागतात असे सांगत प्रस्ताव करणाऱ्या कलाकारांकडून प्रत्येकी दहा-दहा हजार रुपये घेतल्याचे उघड झाले.ही बातमी समजताच कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष तसेच भजनी कलाकार संस्थेचे संस्थाध्यक्ष बुवा श्री.संतोष कानडे यांनी तातडीने उचल घेत संबंधित अधिकाऱ्याची चौकशी केली.तसेच चौकशी अंती संबंधित अधिकाऱ्याने पैसे घेतल्याचे कबूल केले आणि परत देण्याची तयारी दर्शविली.तदनंतर बुवा श्री.संतोष कानडे यांनी पैसे दिलेल्या लाभार्थ्यांची यादी मिळवत त्या सर्व लाभार्थ्यांना कणकवली येथे बोलावत त्या अधिकाऱ्याला दिलेले पैसे अधिकाऱ्याकडूनच परत मिळवून दिले.प्रसंगी या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये मंडल अध्यक्ष कणकवली श्री.मिलिंद मेस्त्री आणि मंडल अध्यक्ष देवगड श्री.संतोष किंजवडेकर उपस्थित होते.
संबंधित अधिकाऱ्याने मागील कलाकारांच्या फसवणुकीचे गुपित देखील उघडे केले आणि म्हणूनच अजूनही कुण्या लाभार्थ्याची फसवणूक झाली असल्यास त्यांनी देखील पुराव्यासहित आपली माहिती कळवावी तसेच यापुढे प्रस्ताव करणाऱ्या कलाकारांनी या योजनेसाठी कुणालाही पैसे द्यावे लागत नाहीत याची नोंद घ्यावी.तसेच मानधन लाभ मिळविण्यासाठी पैश्यांची मागणी झाल्यास तात्काळ कळवावे असे आवाहन बुवा श्री.संतोष कानडे यांनी केले आहे.