कणकवली माजी नगराध्यक्षांच्या इशाऱ्या नंतर कणकवलीतील खड्डे बुजविण्यास सुरुवात

अन्यथा स्वखर्चाने खड्डे बुजविण्याचा दिला होता इशारा
महामार्ग प्राधिकरण कडून तात्काळ दखल
कणकवली शहरातील महामार्गाच्या सर्विस रोडचे खड्डे बुजवण्याबाबत आज रविवारी सकाळी कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांकडे मागणी केल्यानंतर तातडीने आज दुपारपासून कणकवली शहरातील बस स्थानकाच्या समोरील भागापासून सर्विस रस्त्याला पडलेले खड्डे बुजविण्याचे काम महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीकडून हाती घेण्यात आले. दरम्यान आज खड्डे न बुजवल्यास उद्या सोमवारी स्वखर्चातून खड्डे बुजवण्याचा इशारा श्री नलावडे यांनी दिला होता. या इशाऱ्याची तात्काळ दखल महामार्ग प्राधिकरण कडून घेण्यात आली. तसेच कणकवली शहरासोबतच पणदूर , बांबर्डे आदी भागातील देखील खड्डे बुजवण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरण च्या उप अभियंता वृषाली पाटील यांनी दिली. कणकवली शहरात महामार्गाच्या सर्विस रोडला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे शहरातील सर्विस रस्ते खड्डेमय झाले आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी पेव्हर ब्लॉक च्या माध्यमातून खड्डे बुजवण्याबाबत कार्यवाही हाती घेण्यात आली होती. परंतु ही उपाययोजना तात्पुरती ठरली होती. कारण हे खड्डे बुजवल्यानंतर पुन्हा त्याजागी मोठ्या स्वरूपात खड्डे पडल्याने ही कामे तातडीने मार्गी लावण्याबाबत श्री नलावडे यांनी मागणी केली होती. तसेच याबाबत पालक मंत्र्यांचे लक्ष वेधत त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्विस रस्त्यांचे खड्डे बुजवत जनतेची होणारी गैरसोय दूर केली जाणार असल्याचा इशारा श्री नलावडे यांनी दिला होता. कणकवली शहर हे जिल्ह्याच्या मध्यवर्ती असून या ठिकाणी बाजारराहटा साठी शेकडो लोक येत असतात. अशा स्थितीत लोकांना, वाहन चालकांना या खड्ड्यांचा त्रास होतो. ही बाब श्री नलावडे यांनी निदर्शनास आणून देत याबाबत तातडीने कार्यवाहीची मागणी महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांजवळ केली होती. त्याची कार्यवाही हाती घेण्यात आली.