प्रिया चव्हाण आत्महत्ये नंतर माने कुटुंबियांनी केलेल्या फोन चे सीडीआर तपासा

शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाची पोलिस अधीक्षकांकडे मागणी
या प्रकरणी राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा केला आरोप
सावंतवाडी- माठेवाडा निर्माण प्लाझा येथील नवविवाहिता प्रिया पराग चव्हाण हिचा मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देवगड येथील प्रणाली मिलिंद माने व त्यांचा मुलगा यांच्यावर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रिया हिचे वडील विलास तावडे यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात रविवारी तक्रार दिली आहे. प्रणाली माने या भाजप पक्षाच्या देवगड नगर पंचायतच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका आहेत त्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्यानेच प्रणाली माने व मुलगा यांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्ट मंडळाने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, याप्रकरणात प्रणाली माने यांच्या नवऱ्याची देखील चौकशी करावी, घटनेनंतर प्रकरण मिटविण्यासाठी माने कुटुंबियांनी कोणाकोणाला फोन केले त्याचे सीडीआर तपासावेत. प्रिया चव्हाण यांना मारहाण झाल्याची माहिती असून तिच्या आत्महत्ये अगोदर घटना स्थळावर कोण कोण आले, कोणाच्या गाड्या आल्या याचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास करण्यात यावा.
प्रिया चव्हाण यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी निःपक्षपातीपणे या प्रकरणाची चौकशी करावी आणि प्रणाली माने आणि आर्य माने यांना तात्काळ अटक करण्यात यावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी माजी आमदार वैभव विजय नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, देवगड तालुका प्रमुख
रविंद्र जोगल, देवगड महिला तालुकाप्रमुख हर्षा ठाकूर,
नगरसेवक देवगड विशाल मांजरेकर, विभागप्रमुख विकास कोयंडे आदी उपस्थित होते.