आचरे गावासाठी जादा विद्यूत कर्मचारी मिळावेत आचरा सरपंच फर्नांडिस यांची अधिक्षक अभियंता कुडाळ यांच्या कडे मागणी

वाढत्या वीज समस्यांचे निराकरण करण्यासाठी अपु-या कर्मचारी वर्गाबाबत आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी विद्यूत मंडळाचे अधिक्षक अभियंता कुडाळ यांची भेट घेऊन तातडीने दोन वायरमन व एक लाईनमन कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.यावेळी त्यांच्या सोबत उपसरपंच संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर आदी उपस्थित होते.यावेळी दिलेल्या निवेदनात आठ महसूली गाव असलेल्या आचरे गावची लोकसंख्या पाच हजारांहून जास्त आहे.सदर गावची भौगोलिक स्थिती पाहता सद्यस्थितीत कार्यरत असलेले दोन वायरमन व एक लाईनमन या कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण पडत आहे.त्यामुळे तातडीने वीज समस्या मार्गी लावण्यात अडथळा निर्माण होत आहे.त्या बाबत ग्रामस्थांची नाराजी ग्रामपंचायत कडे व्यक्त होत आहे.त्यामुळे वीज समस्या निवारण्यासाठी किमान अजून दोन वायरमन आणि एक लाईनमन आपणाकडून लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत अधिक्षक अभियंता यांनी सकारात्मकता दर्शविल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.