शिकारीकरीता शस्त्र बाळगल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

संशयित आरोपीच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे, ॲड. गायत्री मालवणकर, ॲड. पृथ्वीराज रावराणे यांचा युक्तिवाद
शिकारीच्या उद्देशाने सिंगल बॅरल बंदूक बाळगल्याच्या तसेच रानटी जनावरांच्या शिकारीसाठी फिरताना मिळून आल्याच्या आरोपातून सदानंद मोतीराम पाडावे, लवू परशुराम नर, दोघे रा. सोनाळी, ता. वैभववाडी व जगन्नाथ सहदेव गुरव, रा. कोकीसरे, ता. वैभववाडी यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली श्री. एम.बी. सोनटक्के यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने ॲड. राजेंद्र रावराणे, ॲड. गायत्री मालवणकर व ॲड. पृथ्वीराज रावराणे यांनी काम पाहिले.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की – दि. 12/03/2018 रोजी पहाटे 3.00 वाजण्याच्या सुमारास कुडाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री.ए.एल. भोसले हे आपल्या स्टाफसह सरकारी वाहनाने जिल्हा गस्त आणि वरिष्ठ गस्ती दरम्यान वैभववाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीसाठी फिरत असताना त्यांना आरोपी क्र. 1 सदानंद मोतीराम पाडावे, 2) लवू परशुराम नर, दोघे रा. सोनाळी, ता. वैभववाडी हे रानटी जनावरांचे शिकारीसाठी शस्र्घ घेऊन वापरताना मिळून आले. त्यापैकी लवू परशुराम नर याच्या ताब्यात असलेली बंदूक ही कोकीसरे येथील जगन्नाथ सहदेव गुरव याच्या असलेल्या शेती संरक्षण परवान्याची होती. ती त्याने बेकायदेशीररीत्या लवू परशुराम नर यास वापरावयास दिली. सदर आरोपींना गस्ती पथकाने थांबवून त्यांच्याकडे विचारपूस केली असताना त्यांनी आपण सिंगल बोअर बंदुका घेऊन शिकारीसाठी उभे असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन वैभववाडी पोलीस स्टेशन येथे आणणेत आले व गस्तीपथकातील पोलीस शिपाई मारूती सखाराम साखरे यांनी पोलीस निरीक्षक ए.एल. भोसले यांच्या रिपोर्टावरून सरकार तर्फे फिर्याद दाखल केली. त्यानुसार तीनही आरोपींविरूध्द वैभववाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. 30/2018 येथे भारतीय हत्यार अधिनियम 1959 चे कलम 3/25(1)(क), 29 (ख) व 30 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार आरोपींना अटक करून त्यांचेकडील शस्रे ा जप्त करण्यात आलेली होती व तपासाअंती त्यांचे विरूध्द कणकवली न्यायालयात दोषारोपपत्र पाठवण्यात आले होते. सदर केसची सुनावणी मे. सह न्यायदंडाधिकारी कणकवली श्री. एम.बी. सोनटक्के यांचेसमोर पूर्ण झाली. सरकार पक्षातर्फे एकुण 7 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार तर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या जबान्यांमध्ये असलेली विसंगती आरोपी तर्फे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. सुनावणी अंती न्यायालयाने तिनही आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने ॲड. राजेंद्र रावराणे, ॲड. गायत्री मालवणकर व ॲड. पृथ्वीराज रावराणे यांनी काम पाहिले.