नरेंद्राच्या उंच कड्यावर मानाने उभी ‘सुवारड्याची होळी ‘ मळगांव मधील शिमगोत्सवाची अनोखी परंपरा

प्रत्येक सण अनुभवावा तो कोकणभूमीतच ! कोकणातील प्रत्येक सण म्हणजे दिवाळसण एवढाच मोठा असतो आणि शिमगोत्सव म्हणजे श्रद्धेचा आणि उत्साहाचा आसमंतात भिडलेला अनाहत नाद असतो. याच पार्श्वभूमीवर शिमगोत्सवात सावंतवाडी तालुक्यातील मळगावची सुवारड्याची होळी ही देखील एक अद्भुत परंपरा मानली जाते.
सावंतवाडी व मळगावच्या सरहद्दीवर असलेल्या नरेंद्र डोंगराचा एक उंच कडा असलेल्या सुवारड्याच्या कड्यावर एका प्रशस्त खडकावर ही होळी उभारली जाते. गावचे मानकरी व बारा बलुतेदार वाजत गाजत ढोल-ताशांच्या गजरात सकाळच्या सुमारास या ठिकाणी डोंगर चढून दाखल होतात. त्यानंतर ग्रामस्थही होळीच्या मानाचा नारळ घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहतात.
गाऱ्हाणे बोलणे झाल्यावर गतवर्षीची जुनी होळी सन्मानाने उतरून त्या ठिकाणी नवी होळी उभारली जाते. विशेष म्हणजे ही होळी जाळली जात नाही किंवा तोडलीही जात नाही सांगेली गिरोबाप्रमाणेच ही होळी देखील वर्षभर तेथेच सन्मानाने उभी राहते. पूढील वर्षी ती उतरवून त्या जागी नवी होळी उभी राहते. वर्षानुवर्षे मळगावची ही परंपरा भक्तिभावाने सुरू आहे.