सांडपाणी गटारात सोडणाऱ्यावर कारवाई करा!

न.पं. च्या मुख्याधिकाऱ्याकडे वैभव मालंडकर यांची मागणी
शहरातील कांबळेगल्ली येथील एका अपार्टमेंटमधील सांडपाणी नगरपंचायतीच्या उघड्या गटारात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील विहिरींचे पाणी दूषित होणार असून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. गटारात सांडपाणी सोडणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते वैभव मालंडकर यांनी केली आहे.
अपार्टमेंटमधील सांडपाणी अंडरग्राऊंड पाइपलाइन टाकून पाणी नगरपंचायतीच्या उघडया गटारात सोडण्यात आले आहे. परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटारात सोडण्यात आलेले सांडपाणी जानवली नदीत जात असल्याने पात्रातील पाणी दूषित होऊन गुरे-ढोरे, पशू-पक्षी यांना आजार होण्याची शक्यता आहे. गटारात सोडण्यात आलेल्या सांडपाण्याची पाहणी होणे गरजेचे आहे. सांडपाणी सोडणाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांच्यावतीने मालंडकर यांनी केली आहे. मालंडकर यांच्यासह ४२ नागरिकांच्या निवेदनावर सह्या आहेत. निवेदनाची प्रत पालकमंत्री नीतेश राणे, पर्यावरण मंत्रालय, जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आली आहे.