भटक्या जाती – जमाती मधील नागरिकांना जमीन खरेदी करता सातबाराच्या अटीबाबत विशेष बाब म्हणून निर्णय घ्या!

कणकवली चे माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची प्रांताधिकारी, तहसीलदारांकडे मागणी

वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे तहसीलदारांचे आश्वासन

भटक्या जाती जमाती मधील मांग – गारुडी, गोंधळी समाज, घिसाडी समाज व इतर अन्य जाती, जमाती च्या नागरिकांना कणकवली शहरात घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करण्याकरिता आवश्यक असलेला शेतकरी दाखला उपलब्ध होत नाही. नावावर जमीन नसल्याने या नागरिकांना घर बांधणीसाठी नगरपंचायत कडून आवश्यक ती परवानगी प्राप्त होत नाही. त्यामुळे या जाती – जमातीचे लोक शहरात जमिनी खरेदी करून घर बांधण्यासाठी इच्छुक असताना देखील त्यांच्या जमिनीची खरेदीखत होत नाहीत. त्यामुळे याबाबत महसूल प्रशासन पातळीवर निर्णय व्हावा. या प्रश्नावर कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी कणकवली चे प्रांताधिकारी जगदीश कातकर व तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे लक्ष वेधले. याबाबत प्रशासकीय पातळीवर वरिष्ठ स्तरावर चर्चा करून लवकरच मार्ग काढण्याची ग्वाही तहसीलदार श्री. देशपांडे यांनी दिल्याची माहिती श्री हर्णे यांनी दिली.
कणकवली शहरात मांग – गारुडी, गोंधळी समाज, घिसाडी समाज व इतर भटक्या जाति – जमातीचे
अनेक नागरिक शहरात तात्पुरत्या स्वरूपात किंवा भाड्याच्या घरात राहतात. अनेक वर्ष कणकवली शहरात या समाजाच्या लोकांचे वास्तव्य आहे. परंतु त्यांच्या मालकीचा सातबारा नसल्याने या लोकांना कणकवली शहरात जमीन खरेदी करता येत नाहीत. अनेक शहरी भागात व ग्रामीण भागात देखील या लोकांना जमिनी खरेदी करण्यात अडचणी येतात. जमीन खरेदी करताना खरेदी खता सोबत शेतकरी असल्याबाबतचा पुरावा जोडावा लागतो. परंतु रोजी रोटी साठी इतरत्र फिरणाऱ्या या समाजातील लोकांच्या नावे सातबारा नसल्याने त्यांना आपल्या हक्काची घरे बांधण्यासाठी अडचणी येत आहेत. नगरपंचायत च्या नियमानुसार शहरात घर बांधकाम करायचे झाल्यास तसा अर्ज करून घरकुल बांधकामासाठी परवानगी घ्यावी लागते. व परवानगी मिळाल्यानंतर घरकुलाचे बांधकाम नियमानुसार करावे लागते. परंतु घरकुल परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर त्या अर्जासोबत जोडाव्या लागणाऱ्या कागदपत्रांबरोबर मालकीचा सातबारा जोडावा लागतो. संमती पत्रावर हे काम होत नाही. या मुळे या समाजाची लोक जमिनी खरेदी करून आपली घरे बांधण्यापासून वंचित राहत आहेत. तसेच या लोकांना या समस्येमुळे पंतप्रधान आवास योजनेचा देखील लाभ घेण्यास अडचणी येत आहेत. तरी या प्रश्णी आपल्या स्तरावरून पाठपुरावा करत कणकवली सह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्यत्र देखील या समाजाच्या लोकांनाही भेडसावणारी ही समस्या दूर करावी अशी मागणी श्री. हर्णे यांनी केली आहे. त्यावर तहसीलदार श्री. देशपांडे यांनी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याशी चर्चा करत याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करत मार्ग काढू अशी ग्वाही दिली

error: Content is protected !!