बेळणे वरचीवाडीला वादळाचा तडाखा

घरावर झाडे पडून नुकसान : छप्पराची कौले, पत्रेही उडाले
तालुक्यातील बेळणे खुर्द गावातील वरचीवाडी भागाला आज चक्रीवादळाचा तडाखा बसला. सायंकाळी साडे तीन ते चार च्या सुमारास झालेल्या वादळाने अनेक घरांची छप्परे उडाली. झाडे पडल्यानेही घरांचे नुकसान झाले. या नुकसानीचे सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामे सुरू असल्याने नेमक्या नुकसानीची आकडेवारी समजू शकलेली नाही. आज शनिवारी सकाळपासूनच तलाठी किशोर चौगुले यांच्याकडून पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू होती.
काल दुपारी तीन वाजल्यापासून कणकवली तालुक्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपातील पावसाला सुरवात झाली. त्यानंतर अचानकपणे जोरदार वारे वाहू लागले. यात बेळणेखुर्द गावातील वरचीवाडी भागाला वादळाचा मोठा तडाखा बसला. या वाडीतील अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार वरचीवाडी येथील रामकृष्ण चाळके यांच्या घराचे छप्पर वादळामुळे उडाले. तर प्रभाकर सपकाळ यांच्या घरावर जंगली झाडे पडून घराचे मोठे नुकसान झाले आहे. तर लगतच असलेल्या राजू पवार यांच्या दुचाकीवर आंब्याचे झाड कोसळले आहे.वरचीवाडी भागातील अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.
वादळात बेळणे खुर्द गावातील अनेक झाडे वीज तारांवर कोसळल्याने या गावातील वीज पुरवठा बंद झाला आहे. तसेच बेळणे फिडरवर असलेल्या लगतच्या तिवरे, नांदगाव, हुंबरट, साकेडी या गावांतीलही वीज पुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत ठप्प होता. सायंकाळी नंतर हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
 
	




