…तर आपले जीवन सुखी आणि आनंदी होईल — प्रदीप परब मिराशी

आचरेत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा.
ज्येष्ठ सेवा पुरस्कार लक्ष्मण आचरेकर यांना प्रदान
आचरा –अर्जुन बापर्डेकर
ज्येष्ठांनी छंद, मनोरंजन, सेवा आणि कार्यमग्नता अवलंबावी. ज्या समाजाने आपणास लहानाचे मोठे केले त्या समाजाच्या ऋणात कायम रहावे . आयुष्यभर नारद मुनींची कल्पकता, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची अभ्यासू वृत्ती आणि संत तुकोबांची ईश्वरसेवा यांचे अनुकरण करावे.त्यामुळे आपले जीवन सुखी आणि आनंदी होईल’ असे उद्गार इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचे अध्यक्ष आणि धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई चे कार्याध्यक्ष प्रदीप गोपाळराव परब मिराशी यांनी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी महामेळाव्यात मार्गदर्शन करताना काढले. यावेळी त्यांच्या सोबत
ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी,जेष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर, बाबाजी भिसळे, लक्ष्मणराव आचरेकर,आचरा उपसरपंच संतोष मिराशी, देवस्थान खजिनदार कपिल गुरव, जेष्ठ नागरिक संघाचे
जे एम फर्नांडीस,श्रीमती मनाली फाटक यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना आचरे सारख्या संस्कृती असलेल्या गावात जन्म झाला हि आपल्या साठी मोठी भाग्याची गोष्ट असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले
जागतिक जेष्ठ नागरिक दिन आचरे येथिल रामेश्वर मंदिराच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी देवस्थान नुतन अध्यक्ष
प्रदीप गोपाळ परब मिराशी यांचा अशोक कांबळी यांच्या हस्ते शाल श्रीफळ प्रदान करून सत्कार करण्यात आला.
त्यानंतर श्रुती केशव गोगटे, स्मिता सुरेश हडकर,नामदेव आडवलकर, सुहास सिताराम हडकर या ज्येष्ठांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. तर श्री.सौ.सुरेश हडकर आणि श्री. सौ.अनिल पारकर या दाम्पत्यांना विवाहाला ४५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. वयाच्या 70 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रमाकांत शेट्ये,शिवराम शेटये, दीपक आचरेकर, चंद्रकांत साळकर, राजश्री गोसावी यांचाही ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात
जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरेचे संस्थापक सदस्य लक्ष्मणराव आचरेकर यांना प्रदीप गोपाळराव परब मिराशी यांच्या हस्ते जेष्ठ सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ , मानचिन्ह, मानपत्र असे देऊन जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने त्यांना जेष्ठ सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.