शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत प्रदीप सावंत यांच्या व्हिडिओला जिल्ह्यात प्रथम क्रमांक

राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे आयोजन
कणकवली/मयूर ठाकूर
महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेतर्फे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत नववी ते दहावी माध्यमिक गटात इंग्रजी विषयाच्या व्हिडिओ निर्मितीमध्ये श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्ली संचलित माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली प्रशालेचे सहा. शिक्षक श्री. प्रदीप सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
पहिली ते बारावीपर्यंत अध्यापन करणाऱ्या प्रत्येक विषयाच्या पाच गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. श्री.प्रदीप सावंत यांनी नववी/दहावीच्या वर्गांसाठी Writing Skill – Transfer Verbal Information to Non- verbal ह्या Topic वर व्हिडिओ निर्मिती केली होती.
शिक्षकांमध्ये तंत्रस्नेही चळवळ निर्माण व्हावी, शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी राहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, डीएड शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेतर्फे व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रदीप सावंत हे गेली 26 वर्षे माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली या प्रशालेमध्ये इंग्रजी व भूगोल या विषयाचे अध्यापन करीत आहेत. कोरोना काळात श्री. प्रदीप सावंत सर यांनी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश व भूगोल विषयांच्या व्हिडिओंची निर्मिती करून युट्युब वर प्रसारित केले. Sindhudurg Live च्या ‘Mission SSC’ या शैक्षणिक उपक्रमात Sindhudurg Live च्या स्टुडिओमध्ये सरांचे दहावी इंग्रजी विषयाचे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले होते.
प्रदीप सावंत यांच्या या यशाबद्दल श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्लीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक – शिक्षक संघ, आजी-माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ आणि अभिनंदन केले आहे.