सुंदरवाडीतल्या भाजपा त्रिकुटाच्या ठेकेदारीतल्या भानगडी … जिल्हा संघटकासह धोपटला गेला बाउंसर गडी…

बाऊन्सर म्हटलं म्हणजे सावंतवाडीतील युवा चेहऱ्याचे नाव समोर येते. पण हा नेता मोठमोठे कार्यक्रम घेतो आणि त्याच्या यशस्वीतेसाठी बाऊन्सर वापरतो. पण भारतीय जनता पार्टीचा राजकारणात असे काही चेहरे आहेत की जे पक्ष संघटनेच्या बुरख्याखाली आपले ठेकेदारी चेहरे लपवतात आणि भारतीय जनता पार्टीची पदे घेऊन ठेकेदारीत करोडो रुपये लाटतात. इथे सबका साथ सबका विश्वास अजिबात असत नाही. इथे असतो तो फक्त आपले खिसे भरण्याचा हव्यास.

या हव्यासापोटी नावासारखा शांत नसलेल्या एका जोशी कडून ठेकेदारीपुरते बाउन्सर वापरून दादागिरी केली जाते आणि ठेके पदरात पाडून घेतले जातात. पण आजचा दिवस या त्रिकुटाचा नव्हता. आज पक्ष संघटनेचा पांघरलेला बुरखा सुंदर वाडीतील त्रिकूटाच्या चेहऱ्यावरून हटला आणि भाजपा नेत्याला जिल्हा परिषदेच्या आवारात त्याच्या बाऊन्सर सकट कूट कूट कुटला. याच लाज मात्र भाजपा सारख्या एका चांगल्या पक्षाची गेली.

एरवी आम्ही पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मिरवणारे हे नेते पक्ष आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा वापरतात, ही सुंदर वाडीतील अनेक कार्यकर्त्यांची तक्रार आहे. कालही परिसरातील एका बैठकीत एका सरपंचाला बोलताना या बाहुबली नेत्यांनी रोखले. च्या सरपंचानेही त्याला चांगलेच खडसावले आणि अशी दादागिरी चालणार नाही असे सुनावले. सर्व सरपंच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करण्याच्या मनस्थितीत होते पण वरिष्ठांपूर्वी नियतीनेच त्यांना न्याय दिला. भाजपाचे स्थानिक नेते म्हणून वावरणाऱ्यांचा बुरखा फाडून वरिष्ठांच्या समोर उघड केला. आता झाका किती झाकायचा तो.

आता सुंदर वाडीच्या एका सुंदर स्टेशनच्या सौंदर्यीकरणाच्या कामात ५० लाखाच्या गौडबंगालाचे रहस्य यानिमित्ताने पुन्हा उगाळले जाईल. सुंदरवाडीच्या सुंदर शिल्प”कामामागच्या शिल्पकलेचे यानिमित्ताने पुन्हा नवे कप्पे उघडतील. मागील काही कालावधीत पक्ष ज्या पद्धतीने आणि ज्या कारणाने वापरला जात होता त्याची आता प्रामाणिकपणे चौकशी करण्याची वेळ आली आहे. स्वतःच्या भ्रष्टाचारासाठी आणि राजकीय पोळी शेकवण्यासाठी पक्षाला बदनाम करण्याचा ठेका या ठेकेदारांना कोणीही दिलेला नाही. पक्ष आपल्याला मनमानीपणे वापरता यावा यासाठी यांना पक्षात नवे चेहरे मोठे झालेले नको असतात. आणि तेवढ्यासाठी कोणाचे काही नवे काम चालले असेल तर ते मोडून टाकण्यासाठी हे सगळे अहीमही एकत्र होतात.

या सगळ्यांच्या पापकर्माची चौकशी करणे गरजेचे झाले आहे. वरिष्ठानी गंभीर पावले उचलली नाही तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचा मोठा फटका पक्षाला पडल्याशिवाय राहणार नाही. पक्ष वाढीच्या कामात नेहमी नेहमी आडव्या येणाऱ्या या झारीतल्या शुक्राचार्यांना खड्यासारखे बाजूला करणे ही काळाची गरज बनली आहे.

error: Content is protected !!