आमदार नितेश राणे हेच खंडणीखोर!
माजी आमदार परशुराम उपरकर यांचा राणेंवर पलटवार
भाजपा प्रवेशासाठी राणेंना बसस्थानकासमोर ताटकळत रहावे लागले
नितेश राणेंचा भाजपा प्रवेश माजी आमदाराच्या हस्ते
आमदार नितेश राणे यांनी माझ्यावर ब्लॅकमेलिंगचा आरोप केला. मुळातच नितेश राणे हेच खंडणीखोर आहेत. त्यांच्यावर मुंबई येथील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच माझ्या कुंडल्या काढण्याच्या भानगडीत नितेश राणेंनी पडूच नयेत. कारण नितेश राणे आणि त्यांचे वडील खासदार नारायण राणे यांच्या अनेक कुंडल्या माझ्याकडे आहेत. माझ्या कुंडल्या काढण्याचा प्रयत्न नितेश राणे यांनी केला तर, मी तुम्हाला साफ उघडा पाडेन असा इशारा, माजी आमदार परशूराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. उपरकर पुढे म्हणाले, कणकवली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कामात आमदार नितेश राणे हे ठेकेदाराकडून टक्केवारी घेत आहेत हे सर्वांना माहीत आहे. ह्या राणेंच्या या टक्केवारीच्या राजकारणामुळे सर्व कामे निकृष्ट दर्जाची आहेत. करूळ घाट रस्ता गेले दहा महिने बंद आहे. त्या रस्त्याच्या ठेकेदाराकडूनही राणेंनी टक्केवारी घेतलीय. त्यामुळेच एवढे महिने घाटमार्ग बंद असूनही राणे गप्प आहेत. श्री. उपरकर म्हणाले, माझी मनसेतून हकालपट्टी झाल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. वस्तुतः मी वर्षभरापूर्वीच मनसे पक्ष सदस्याच्या राजीनामा दिला होता. त्यामुळे पक्षातून हकालपट्टी होण्याचा विषयच येत नाही. या उलट शिवसेना पक्षातून बाळासाहेब ठाकरे यांनी राणेंची जाहीरपणे हकालपट्टी केली होती हे राणेंनी विसरू नयेत विकासकामांच्या अनुषंगाने माझे पूर्वीचे सहकारी आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटत असतो. त्याच धर्तीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेत असतो. यातील कुठल्या भेटीत माझ्या पक्षप्रवेशाची चर्चा झाली याचे पुरावे नितेश राणे यांनी द्यावेत असे श्री. उपरकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले, पक्ष प्रवेशासाठी मी कुणाचेही उंबरे झिजवले नाहीत. पण काँग्रेसमध्ये प्रवेश करताना राणेंना किती काँग्रेस नेत्यांचे उंबरे झिजवावे लागले हे सर्वश्रुत आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांना वारंवार भेटूनही राणेंना भाजपमध्ये प्रवेश दिला नव्हता. एवढेच नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्या यात्रेत प्रवेश मिळेल म्हणून नारायण राणे, नितेश राणे दोन तास कणकवली बसस्थानकासमोर वाट बघत थांबले होते. पण या यात्रेत भाजप प्रवेश देण्यात आला नाही. नारायण राणेंना भाजप प्रदेश कार्यालयात तर नितेश राणेंना एका माजी आमदाराच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यावरून राणेंनी आपली भाजपमधील कुवत ओळखावी. स्वतः खंडणीखोर आणि टक्केवारीवर राजकारण करणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी माझ्या कुंडल्या काढण्याच्या भानगडीत पडू नये असा इशारा उपरकर यांनी दिला आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली