आमदार विजय सरदेसाई यांच्या मराठी विरोधी वक्तव्याचा निषेध

त्यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची केली मागणी

पर्वरी येथे झाली मराठी भाषा प्रेमींची विशेष बैठक

गोवा विधानसभा सभागृहामधील मराठी भाषाप्रेमी आमदारांनी आमदार विजय सरदेसाई यांच्या विरोधात हक्कभंग आणून त्यांच्यावर सभागृहातच कारवाई करण्यात यावी, असा ठराव मराठी भाषा प्रेमींच्या विशेष बैठकीत घेण्यात आला.
पर्वरी येथील गोमंतक मराठी अकादमी येथे मराठी राजभाषा प्रस्थापन समिती, गोमंतक मराठी अकादमी व मराठी असे आमुची मायबोली यांची विनोद पोकळे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा प्रेमींची विशेष बैठक घेण्यात आली.
गोवा विधानसभेत आमदार विजय सरदेसाई यानी मराठीबद्दल अवमानजनक शब्द वापरल्याबद्दल सर्व वक्त्यांनी त्यांनी केलेल्या विधानाचा निषेध केला.त्यांच्यावरील हक्कभंगाच्या संदर्भात पुढील कारवाई करता सभापती रमेश तवडकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन सादर करण्यात येईल असेही मराठी प्रेमींनी सांगितले.
या विशेष बैठकीमध्ये अनेक ठराव मंजूर करण्यात आले. गोवा विधानसभेच्या अधिवेशनात आमदार विजय सरदेसाई यांनी मराठी भाषेबद्दल व्यक्त केलेल्या मताबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठी भाषा गोमंतकाच्या तळागाळापर्यंत पोहोचलेली भाषा असून तिला कायदेशीर मान्यता आहे. या समृद्ध भाषेबद्दल सभागृहामध्ये ज्या पद्धतीने मत व्यक्त केले यावरून त्यांना मराठी बद्दल राग आणि द्वेष आहे. गोव्यात पूर्वापार वापरात येणारी मराठी भाषा त्यांना नको आहे असे स्पष्ट होते.
त्यामुळे गोव्यातून प्रसिद्ध होणाऱ्या सर्व मराठी वृत्तपत्रांचे संपादक, मालक, प्रकाशक यांनी यापुढे आमदार विजय सरदेसाई यांना आपल्या वर्तमानपत्रात अजिबात प्रसिद्धी न देता आपला मराठी भाषेचा स्वाभिमान कायम राखावा अशी विनंती मराठी प्रेमींनी केली.
मराठी राज्यभाषा व्हावी, याकरिता यापुढे विविध स्तरातील कार्यकर्ते, विचारवंत, लेखक, साहित्यिक, संशोधक यांना एकत्रित करून भाषा संवर्धनाबरोबर विशेष प्रयत्न करावेत असा ठराव घेण्यात आला.
यावेळी विनोद पोकळे, प्रकाश भगत, अॕड. अजितसिंग राणे, राजाराम पाटील, बाबली कांदोळकर यांनी आपली मते व्यक्त केली.
बैठकीचे अध्यक्ष विनोद पोकळे यांनी उपस्थित मराठी प्रेमींचे स्वागत केले तर राजाराम पाटील यानी आभार मानले

प्रतिनिधी, दोडामार्ग

error: Content is protected !!