प्रा.वैभव साटम यांच्या भावकी अन गावकी व्यक्तीचित्रण आणि सहा माणसांच्या सहा गोष्टी कथासंग्रहाचे प्रकाशन संपन्न

भावकी अन गावकी मध्ये अखिल मानव जातीचे प्रतिबिंब ; दीर्घकथा लेखनातील बारकावे प्रा.साटम यांनी टिपले – डॉ. महेश केळूसकर

कणकवली : कणकवली तालुक्यातील आयनल गावचे सुपुत्र लेखक प्रा.वैभव साटम लिखित डिंपल पब्लिकेशन आणि सृजनसंवाद प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या भावकी अन गावकी या व्यक्तिचित्रणाचे व सहा माणसांच्या सहा गोष्टी या कथासंग्रहाचे प्रकाशन सोहळा ठाणे कोपरी येथील मंगला हायस्कुलच्या मिनी हॉल मध्ये डॉ अनंत देशामुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी जेष्ठ कवी डॉ महेश केळूसकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे म्हणाले की हे वर्ष डिंपल पब्लिकेशनचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या पन्नास वर्षाच्या काळात प्रकाशन व्यवसाय झपाट्याने बदलतो आहे पण आजही लोक पुस्तक विकत घेऊन वाचत आहेत. याचं बरोबर सृजनसंवाद प्रकाशन तर्फे बोलताना संपादक व युवा कवी गीतेश शिंदे म्हणाले की, सृजनसंवाद ही प्रकाशनसंस्था नव्याने सुरु झाली या दरम्यान वैभव साटम यांची दोन पुस्तके मला काढता आली. भावकी अन गावकीतील व्यक्ती ही केवळ त्या प्रदेशपूर्ती मर्यादित न रहाता त्या अखिल मानव जातीचे प्रतिनिधीत्व करतात.
डॉ महेश केळूसकर यांनी वैभव साटम यांच्या साहित्यातील सुरुवातीच्या दिवसात त्यांची व्यक्तिचित्र रेखाटण्याची कला आपल्याला विशेष भावली हे नमूद करताना दीर्घकथा लिहिताना किती बारकावे टिपावे लागतात हे विषद करुन सहा माणसांच्या सहा गोष्टी या दीर्घकथा संग्रहातील चिखल या कथेचे त्यांनी अभिवाचन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात डॉ देशमुख यांनी दीर्घकथा हा साहित्यप्रकार दुरास्पद होत असताना वैभव साटम यांनी संशक्त पणे हा प्रकार हाताळला आहे, कोकणातील आजची जीवनशैली, समाजकारण बदलत असताना त्या बदलत्या काळाच्या ह्या कथा आहेत, उद्या कोकणातील सध्याचे पाच लेखकात वैभव साटम यांचे देखील नाव घ्यावे लागेल. सदर कार्यक्रमाच्या वेळी जेष्ठ कवी अशोक बागवे, सतीश सोळाकुरकर, अनघा प्रकाशनचे मुरलीधर नाले व अमोल नाले, अभिनेत्री ज्योती निसळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!