टोक्याच्या त्रासाने त्रस्त ग्रामस्थांची धान्य गोदामाला धडक
नेरूर-गोंधयाळेवाडी ग्रामस्थ कीटकांच्या त्रासाने हैराण
गोदाम अधिकाऱ्यांना धरले धारेवर
अतिरिक्त धान्य साठ्यामुळे समस्या अधिक गंभीर
प्रतिनिधी । कुडाळ : महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामातील धान्याला मोठया प्रमाणावर टोका पडल्याने त्या कीटकाचा त्रास लगतच्या नेरुर-गोंधयाळे वाडीतील रहिवाशांना होत आहे. हे कीटक मोठ्या प्रमाणात घरात, जेवणात आढळत असल्याने हे रहिवाशी हैराण झाले आहेत. अखेर या ग्रामस्थांनी गुरुवारी वखार महामंडळाच्या कार्यालयाला धडक देत अधिकाऱ्याना धारेवर धरले. यावेळी महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. गोदामातील अतिरिक्त धान्यसाठ्यामुळे टोक्याचे प्रमाण देखील वाढले आहे हि बाब अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली. त्यावर उपाय योजना सुरु असून, वरिष्ठ अधिकारी देखील दोन दिवसात याची पाहणी करून निर्णय घेतील अशी ग्वाही यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. त्यावेळी ग्रामस्थ काही प्रमाणात शांत झाले पण या कीटकांचा बंदोबस्त झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
टोके नावाच्या या कीटकांच्या त्रासामुळे नेरुर गोंधयाळेवाडीतले ग्रामस्थ हैराण झाले आहेत. टोके नावाचे हि कीटक या वाडीत येण्यासाठी कारणीभूत ठरले आहे ते महाराष्ट्र राज्य वखार महामंडळचे एमआयडीसीतील धान्याचे गोदाम. या गोदामाच्या बाजूलाच या वाडीतल्या लोकांची वस्ती आहे त्यामुळे गेला महिनाभर या कीटकांच्या त्रासाने हे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. मोठ्या संख्येने हे कीटक घरात येतात. संपूर्ण खोलीभर पसरतात. जेवणात, कपड्यात पडतात. हे कीटक चावले की खाज सुटते. खाजवून खाजवून जखमा होतात. हे कीटक कानात गेले तरी सुद्धा मोठी इजा होऊ शकते.
धान्य गोदाम बाजूलाच असल्याने गेली दहा वर्ष येथील रहिवासी साधारण मे महिन्याच्या सुरुवातीपासून हा त्रास सहन करत आहेत. पण यंदा हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कीटक मोठ्या प्रमाणात वस्तीत येऊ लागले. त्यामुळे या ग्रामस्थांनी वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सुरुवातीला निवेदन दिले. बंदोबस्त करतो असे आश्वासन मिळाल्यामुळे ग्रामस्थ वाट बघत राहिले. पण त्रास कमी होताच नव्हता आणि काही प्रतिबंधात्मक उपाय सुद्धा संबंधित यंत्रणेकडून योजले गेले नाहीत. त्यामुळे या ग्रामस्थांच्या त्रासाचा आणि सहनशीलतेचा कडेलोट झाला आणि या संतप्त ग्रामस्थांनी संघटित होऊन वखार महामंडळाचे ऑफिस गाठत ज्युनियर स्टोरेज सुप्रिटेंडन्ट समृद्धी नांदगावकर याना जाब विचारला.
वखार महामंडळाच्या अधिकारी समृद्धी नांदगावकर यांनी लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. गोदामामध्ये अतिरिक्त धान्य साठा झाल्यामुळे टोक्याचे प्रमाण वाढल्याचं त्यांनी सांगितले. तसेच कीटकनाशक फवारणी केल्याचे सुद्धा सांगितले. पण कीटक नाशक फवारणी केल्यावर हे कीटक तिथून परत वस्तीवर आले. नांदगावकर यांनी सर्व ग्रामस्थांना गोदामामध्ये कसा अतिरिक्त धान्यसाठा भरून ठेवला आहे आणि त्यावर फिमिगेशन म्हणजे धान्याची पोटी कशी कव्हर केली आहेत, ते देखील ग्रामस्थांना दाखविले. गोदामात सुद्धा ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
ग्रामस्थ गोदाम प्रशासनाला जाब विचारत असतानाच कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे हे देखील वखार महामंडळाच्या कार्यालयात दाखल झाले. ग्रामस्थांनी त्यांच्या समोर देखील आपल्या अडचणींचा पाढा वाचला. याला जबाब्दार कोण असा प्रश्न विचारला. तहसीलदार श्री. वसावे यांनी वखार मंडळाच्या पनवेल येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण अधिकाऱ्यांचा संपर्क होत नव्हता. समृद्धी नांदगावकर यांनी बरच वेळ प्रयत्न करून देखील पनवेलचे वरिष्ठ अधिकारी फोन वर उपलब्ध होत नव्हते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी संपर्क करताच त्या अधिकाऱ्यांचे बोलणं झाले. हे अधिकारी उद्या पाहणीसाठी येणार आहेत आणि त्यांनतर अतिरिक्त धान्य साठ्याची उचल करण्याबाबत तोडगा निघेल असे श्रीमती नांदगावकर यांनी सांगितले. .
दरम्यान या कीटकांचा त्रास थांबला नाहीतर तीव्र आंदोलन करणायचा इशारा ग्रामस्थांनी दिला. त्याचबरोबर शिवसेनेने देखील या विषयामध्ये ग्रामस्थांच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितले. ही समस्या जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत येथील एकही धान्याची गाडी येऊ किंवा जाऊ देणार नाही असा इशाराच त्यांनी दिला आहे.
यावेळी अजित मार्गी,ग्रा.प.सदस्य गणेश गावडे,मंगेश राऊत,राजेश सडवेलकर,किशोर सामंत, लक्ष्मण लोके,परेश जावकर,रामा कांबळी,सुंदरी शेगले, दिनेश कर्लीकर,कुणाल गावडे,अनिल गावडे, चंद्रकांत गावडे,शिल्पा गावडे,गौरी गवाणकर,प्रांजल गावडे,सीमा चिपकर,माधुरी जावकर, शारदा गावडे, प्रियांका कलिंगण, योगश सामंत, सुमन चिपकर, कविता गावडे, आपा धोंड, आदिसह नेरुर गोंधयाळेतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्षमतेपेक्षा जास्त धान्य साठा केल्यानं आणि एप्रिल – मे या या कीटकांच्या वाढीचा काळ असल्याने गोदामातल्या धान्यात हे टोके मोठ्या प्रमाणावर झाले आणि त्याचा त्रास मात्र लगतच्या वस्तीला सहन करावा लागतोय. प्रशासनाने वेळीच लक्ष दिला तर निदान भविष्यात तरी हा त्रास सहन करावा लागू नये अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.