आचरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी वीज अधिकाऱ्यांना तीन तास धरले रोखून

मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्रानंतर आंदोलन स्थगित

आचरा, चिंदर, वायंगणी, तोंडवळी ग्रामस्थ झाले होते सहभागी

ऐन दिवाळीपासून आचरा सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागात सातत्याने विजेचा लपंडावं चालू असल्याने संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरणला धडक देण्याचा इशारा दिला होता. गुरुवारी सकाळी आचरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आचरा वीज वितरण कार्यालयात धडक देत उपस्थित झालेल्या उपकार्यकारी अभियंता यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत 3 तास कार्यालयात रोखून धरले होते. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत जाऊ देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. अखेर उपकार्यकारी अभियंता राहुल लिंबकर, यांनी ग्रामस्थांच्या असलेल्या मागण्या मान्य करून येत्या 10 दिवसात कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले असता ग्रामस्थांनी येत्या 10 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा पूर्वसुचना न देता उग्र आंदोलन छेडणार असल्यासचा इशारा देत आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

आचरा सबस्टेशन मधून सातत्याने वीज खंडीत होत असल्यामुळे आचरा गावासह तोंडवळी, वायंगणी, चिंदर त्रिंबक भागातील ग्रामस्थ व व्यापाऱ्यांना फटका बसला होता. वीज वितरणला जाब विचारण्यासाठी आचरा पंचक्रोशी गावातील ग्रामस्थ सरपंच जेराॅन फर्नांडिस, महेश राणे, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, माजी सरपंच राजन गावकर, मंगेश टेमकर, तोंडावळी माजी सरपंच संजय केळूसकर, व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत, जयप्रकाश परुळेकर, अभिजित सावंत, डॉ. प्रमोद कोळंबकर, ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, महेंद्र घाडीं यांसह सिद्धार्थ कोळगे, गुरु कांबळी, विजय कदम, नाना पाटील, मंदार सरजोशी, उदय घाडी, समीर बावकर, जयंत पांगे, विदयानंद परब, बाळा घाडी, सुनील दुखंडे, शिंबू नायर, निखिल ढेकणे यांसह अन्य ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलन स्थळी उपस्थित झाले होते.
आचरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित झालेल्या उपकार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता राहुल लिंबकर, सहाय्यक अभियंता सौरभ वर्मा, सहाय्यक अभियंता ओम शिंदे यांच्यावर प्रश्नांचा बडीमार केला. गेले कित्येक दिवस या भागात लाईटचा सावळागोंधळ आहे. आचरा कार्यालयाचा चार्ज आपल्याकडे असताना इथले अधिकारी ग्रामस्थांना नीट उत्तरे देत नाहीत लाईट गेली की दहा बारा तास लाईट गायब असते स्मार्ट मीटर जबरदस्ती ने बसवले जातात. ग्राहकांना बिले कमी करून दिली जात नाहीत. तीन महिन्या पूर्वी केलेली एकही मागणी पूर्ण नाही. येथील ग्रामस्थ दहा बारा तास अंधारात राहत आहेत. रिसॉर्टला आलेले पर्यटक लाईट नसल्याने बुकिंग रद्द करून मघारी फिरले आहेत, व्यापाऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहेत. याला जबाबदार कोण याचे उत्तर द्या तोपर्यंत कार्यालयातून जाऊ देणार नसल्याचा इशारा देऊन अधिकाऱ्याना ग्रामस्थांनी रोखून धरले होते.
आचरा वीज वितरण मध्ये आंदोलन चालू असताना स्वतंत्र आचरा फिडर बसवावा अशी मागणी सातत्याने आचरा ग्रामस्थांनी केली होती. मागणी करूनही यावर अंमलबजावणी झालेली नाही असे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी उपकार्यकारी अभियंता यांनी कार्यालयातील उपस्थित महिला कर्मचारीला मागणी पत्र दाखवण्यास सांगितले. यावेळी उपस्थित महिला कर्मचारी ही ग्रामस्थांशी उद्धटपणे बोलू लागल्यावर ग्रामस्थ आणि महिला कर्मचारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर जर ही महिला ग्रामस्थांबरोबर अशी वागत असेल तर तिच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती. केलेल्या मागणीपैकी आचरा उपविभागातील उपकार्यकारी अभियंता हे पद रिक्त असून ते त्वरित भरण्यात येवून आचरा उपविभागास कायमस्वरूपी उपकार्यकारी अभियंता यांची नेमणूक करण्यात यावी, उच्चदाब वाहिनी 33KV तळेबाजार हि १२ तारीख पर्यंत भूमिगत करण्यात येईल, आचरा शाखेमध्ये बाह्यस्त्रोत कर्मचारी यांची संख्या वाढविण्यात येईल., तोंडवळी, तळाशील, चिंदर, वायंगणी या गावांसाठी प्रत्येकी एक बाह्यस्त्रोत कर्मचारी लवकरात लवकर देण्यात येईल, मुणगे फिडर पूर्ण पणे वेगळा करण्यात येईल, आचरा फिडर वेगळा करण्यात येईल, स्मार्ट मीटर बाबत लोकांचा जन आक्रोश व विरोध असल्या कारणाने सुस्थितीत असलेले नॉर्मल मीटर बदलण्यात येणार नाहीत, आचरा शाखेमध्ये रात्र पाळीसाठी अतिरिक्त कर्मचारी यांची व्यवस्था करण्यात येईल, नियमित वीज पुरवठा २३० राहील याची दक्षता घेण्यात येईल, आचरा ग्रामस्थ यांच्याशी शाब्दिक गैरवर्तणूक करणाऱ्या महिला कर्मचारी यांचेवर योग्य ती कार्यवाही येत्या ८ ते १० दिवसात करण्यात यावी व त्यांच्या जागेवर योग्य तो सक्षम कर्मचारी लवकरात लवकर उपलब्ध करण्यात येईल. तसेच वरील सर्व बाबी १२ तारखेपर्यत पूर्ण न झाल्यास आचरा येथील ग्रामस्थ वीज बिलाची भरणा करणार नाहीत व त्यांच्यावर कार्यवाही करणार नाही. असे लेखी पत्र वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता राहुल लिंबकर यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले

error: Content is protected !!