चिंचवली मधलीवाडी शाळेत तीन नव्या शिक्षकांची नेमणूक..

सूर्यकांत भालेकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश..
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत नुकतीच जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये नवीन प्राथमिक शिक्षकांची भरती करण्यात आली. या शिक्षक भरती मधून आपल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंचवली मधलीवाडी या शाळेत तीन नवीन प्राथमिक शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही नेमणूक करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ सदस्य श्री. सूर्यकांत भालेकर यांनी शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यामुळे शिक्षण विभागाने प्राधान्याने आपल्या शाळेला तीन शिक्षक दिले आहेत.
आपल्या चिंचवली मधलीवाडी शाळेत एकूण चार शिक्षकांची पदे मंजूर आहेत. गेल्या वर्षभर शाळेत केवळ दोनच शिक्षक श्रीमती सविता पवार आणि श्री. अमोल भंडारी कार्यरत होते.त्यापैकी श्री.अमोल भंडारी सर हे पंधरा दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद सोलापूर येथे शिक्षण विस्तार अधिकारी पदावर नियुक्त झाले असल्यामुळे शाळेत केवळ एकच शिक्षिका श्रीमती पवार या कार्यरत होत्या. ही बाब लक्षात घेऊन श्री.सूर्यकांत भालेकर यांनी पंचायत समिती कणकवली चे गटशिक्षणाधिकारी श्री. किशोर गवस यांच्याकडे आगामी भरतीतून आमच्या शाळेला रिक्त असलेल्या तीन पदांवर शिक्षक मिळावेत अशी मागणी सातत्याने केली. तसेच जर शिक्षक दिले नाहीत तर जून पासून शाळा बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांना दिला होता. याची दखल घेऊन गटशिक्षणाधिकारी श्री. गवस साहेब यांनी जिल्हास्तरावर चिंचवली मधलीवाडी शाळेसाठी तीन शिक्षक देण्याविषयी कळविले होते. त्यानुसार आपल्या शाळेत श्री. अजय गरकळ,श्रीमती रेखा डिसले आणि श्रीमती कुरणे अशा तीन नवीन शिक्षकांची नेमणूक झाली आहे. याबद्दल संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे..
अस्मिता गिडाळे,खारेपाटण