भाजपा कार्यकर्त्यांची कणकवली पोलीस स्टेशनवर धडक

माजी जि. प. अध्यक्ष सावंत यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंदे, अमली पदार्थांची विक्रीवर कारवाईची मागणी

अन्यथा, लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

कणकवली तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध धंदे, अमली पदार्थांची विक्री यावर चर्चा करण्यासाठी भाजपा उपाध्यक्ष व माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात धडक दिली. तसेच या संदर्भातील निवेदन कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांना देण्यात आले. यावेळी समशेर तडवी यांनी या सर्व अवैध धंदे व अमली पदार्थ विक्रीवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.मात्र, योग्य कारवाई न झाल्यास भाजपाकडून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा पदाधिकाऱ्यांनी श्री. तडवी यांना दिला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, वागदे सरपंच संदीप सावंत, समीर प्रभूगावकर, अभय गावकर, प्रसाद कोरगावकर, सर्वेश दळवी, विजय चिंदरकर, सागर पवार, सुभाष मालंडकर, सौरभ रावले यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात गेल्या काही महिन्यात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. अवैध दारू अनेक ठिकाणी राजरोसपणे उपलब्ध असूनही त्याबाबत पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही आहे. गांजा व तत्सम अमली पदार्थांचा वापर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्यातील अनेक गावांपर्यंत याची पाळेमुळे खोलवर गेलेली असतानाही पोलीस यंत्रणेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पोलिसांच्या या दुर्लक्षामुळे तरुण वाईट मार्गाकडे जात आहे. पोलीस केवळ आकडेवारी दाखवण्यासाठी एखाद दुसरी कारवाई केल्याचे दिसून येते. मात्र त्यानंतर हे अवैध धंदे पुन्हा नव्या जोमाने सुरू झालेले दिसून येतात. या अवैध धं‌द्यांसोबतच मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी असे सर्वच प्रकारचे अवैध धंदे तालुक्यात राजरोसपणे सुरू असतानाही पोलीस यंत्रणा त्याकडे डोळेझाक करत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असताना पोलिसांच्या या भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेबाबत संशयाचे वातावरण निर्माण होत आहे. तसेच तालुक्यात या अवैध प्रकारांमुळे गैरप्रकारही होण्याची शक्यता वाढत असून पोलीस यंत्रणेने या सर्व गोष्टींवर तातडीने कडक पावले उचलावीत अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल. असे म्हटले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!