साकेडीतील विद्युत पुरवठा वारंवार खंडित प्रकरणी उपकार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयावर धडक

तातडीने समस्या सोडवा अन्यथा पुन्हा घेराव घालणार

साकेडीतील वीज समस्या येत्या दहा दिवसात सोडवण्याचे उपकार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन

गेले पंधरा दिवस साकेडी गावामधील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याचा प्रकार सुरू असून त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्यामुळे पाण्याचे पंप व घरगुती उपकरणे सुद्धा नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे याबाबत तात्काळ उपायोजना करा अन्यथा ग्रामस्थांकडुन पुन्हा एकदा आपल्याला घेराव घातला जाईल असा इशारा साकेडी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाच्या वतीने आज उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांना देण्यात आला. यावेळी श्री. बगडे यांनी साकेडीतील वीज समस्यांबाबत येत्या दहा दिवसात मार्ग काढण्याची ग्वाही दिली. यावेळी गावातील तारांवरील ट्री कटिंग व जीर्ण पोल बदलण्याबाबतही मागणी करण्यात आली. नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे मंदिराकडे जाणाऱ्या स्ट्रीट लाईटचे पोल तसेच मुख्य रस्त्यावरील काही पोल मोडल्याने हे काम देखील करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर श्री बगडे यांनी जीर्ण झालेले लोखंडी पोल व ट्री कटिंग चे काम येत्या दहा दिवसात मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. साकेडी गावातील वीज समस्यांबाबत आज उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांची शिष्टमंडळाने भेट घेत त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने त्याची नेमकी कारणे काय? असा सवाल करण्यात आला. त्यावेळी साकेडी फौजदारवाडी चा भाग पावणादेवी फिडरवर तर उर्वरित भाग खारेपाटण फिडरवर आहे. त्यामुळे याबाबत माहिती घेतली जाईल व त्यानुसार कार्यवाही करू अशी ग्वाही दिली. मात्र आम्हाला माहिती नको समस्या केव्हा सोडवणार त्याचे आश्वासन द्या. अन्यथा गप्प बसणार नाही असा इशारा दिला. यावेळी श्री. बगडे यांनी 1 मे पासून आतापर्यंत 18 वेळा लाईन ट्रिपिंग झाल्याचे मान्य केले. मात्र ह्या ट्रिपिंगचा समस्या सोडवण्यासाठी पियाळी स्टेशन मधील रिले गुरुवारी बदलला जाईल व त्यानंतर समस्या सुटेल अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले. सातत्याने गावातील विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने तारांवरील ट्री कटिंग करून घ्या अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी संबंधित त्यांच्या खालील अधिकाऱ्यांना ट्री कटिंग बाबत तात्काळ सूचना दिल्या. व येत्या 10 दिवसात हे काम मार्गी लागले पाहिजे असे देखील आदेश दिले. गावातील अनेक वाड्यांमधून जीर्ण झालेले पोल अद्यापही जैसे ते आहेत. काही ठिकाणी विद्युत भारित तारा हाताला लागेपर्यंत खाली आलेल्या आहेत. मात्र सातत्याने मागणी करून देखील ही कामे मार्गी लागत नसल्याने याबाबतही निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी श्री. बगडे यांनी या संदर्भात देखील वायरमन यांना सूचना देत त्याची पाहणी करून तात्काळ अहवाल सादर करा व हे काम मार्गी लावून घ्या असे आदेश दिले. केवळ दिखाऊपणापुरते आदेश नको तर कामे मार्गी लागली पाहिजेत. अन्यथा पुन्हा दहा दिवसांनी कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालू असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर, सोसायटी संचालक राजू सदवडेकर, माजी उपसरपंच विजिन जाधव, ग्रामस्थ अजित शिरसाट, रवींद्र कोरगावकर, अरविंद सावंत आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!