कणकवली तालुक्यात नाटळ मध्ये एकाला जबर मारहाण

कणकवली पोलिसात मारहाण करणाऱ्या तिघा विरोधात गुन्हा दाखल
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनेने तालुक्यात खळबळ
लोकसभा निवडणुकीच्या आदल्या रात्री कणकवली तालुक्यातील नाटळ मध्ये तंटामुक्तीचे अध्यक्ष असलेल्या गणेश सावंत यांना लोखंडी रॉड तसेच बांबू ने मारहाण करत जबर जखमी केल्याची घटना रात्री 11 वा. च्या सुमारास घडली. घटनेनंतर गणेश सावंत यांना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना गंभीर दुखापत झाली असून याबाबत रात्री उशिरा कणकवली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिघांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश सावंत हे काही महिन्या पूर्वी तंटामुक्त अध्यक्ष झाले होते. या पदाकरिता किशोर परब हे इच्छुक होते. गेले दोन महिने तंटामुक्त अध्यक्षपद सोड अशी मागणी किशोर परब करत होते. या कारणातून गणेश सावंत हे जेवण झाल्यावर रस्त्यावर फिरत असताना तिघांनी येत मारहाण केल्याची फिर्याद गणेश सावंत यांनी दिली आहे. या फिर्यादीनुसार किशोर परब, किरण परब व बाबल्या खंदारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश सावंत यांच्या तोंडाला जखम झाली असून डावा हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच पाठीवर छातीवर तसेच हात पाय वर बांबू ने मारुन जखमी केले आहे असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कणकवली तालुक्यात घडलेल्या या घटनेमागे राजकीय कारण असल्याची देखील तालुक्यात चर्चा आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली