संकल्प प्रतिष्ठान द्वारा कणकवली येथे फणस प्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन

संकल्प प्रतिष्ठान द्वारा कणकवली येथे दि. १० ते १२ मे, २०२४ या कालावधीमध्ये फणस प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात कच्च्या व पिकलेल्या फणसापासून मागणी असणा-या विविध मुल्यवर्धित उत्पादनांचे प्रात्यक्षिकसह प्रशिक्षण दिले जाणार आहे.
नुकताच संस्थेला १३ वर्षे पूर्ण झाली असून गेली १३ वर्षे या संस्थेद्वारे उद्योग/व्यवसायाच्या संधीचा अभ्यास करून विविध प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
कोकण म्हणजे सुमधुर फळांनी बहरलेले नंदनवन ! अनेक फळांसोबत फणस ही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. फणस हे असंं एकमेव फळ आहे की त्याच्यासारखा दुसरं फळ नाही. परंतु दुर्दैवाने कोकणात मात्र मोठ्या प्रमाणात फणस वाया जात आहे.
कोवळ्या फणसाची पुसभाजी, जून फणसाची भाजी व पिकलेल्या फणसाचे गरे याच्या पलिकडे आपण जात नव्हतो. हल्ली काही वर्षांपूर्वीच कच्चे गरे तळून वेफर्स / चिप्स उत्पादनांकडे लोकांचा कल वाढलेला आहे. वास्तविक पाहता फणसापासून शेकडो मुल्यवर्धित उत्पादने तयार करता येतात. यात बाजी मारली आहे ती केरळ राज्याने.
कोकणातील लोकांनी सुद्धा या वाया जाणा-या फणसापासून उत्पादने तयार करून त्यापासून अर्थार्जन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
फणस प्रक्रिया खरं तर ही एक उद्योगसंधी आहे. या संधींचा पुरेपूर फायदा घेतला जावा यासाठी संकल्प प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे.
कच्चा माल मुबलक प्रमाणात असल्याने उत्पादन खर्चात बचत होऊ शकते. प्रक्रिया केल्यास अनेक मुल्यवर्धित उत्पादने तयार करून त्यांचा आस्वाद वर्षभर घेता येईल. त्यामुळे नैसर्गिक संपत्तीचा होणारा -हास थांबून अर्थार्जनची संधी उपलब्ध होईल.
फणस हा बहुगुणी असून कच्च्या ग-यांची पावडर मधुमेहावर गुणकारी आहे. अशा या आरोग्यदायी असलेल्या फणसात अ, ब-६, क या जीवनसत्वांची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. त्याचप्रमाणे फणसाचे सेवन केल्यास कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलिक ॲसिड, थायामिन आणि नियासिन सारखे अति लाभदायक असणारे खनिज पदार्थ मिळतात.
फणस खाल्ल्यास शरीरास अनेक लाभ मिळतात. फणसाला व्हेज मिट (शाकाहारी मांस) असेही म्हटले जाते.
फणसाचा काहीही भाग वाया जात नाही. कोवळे फणस, कच्चे फणस, पिकलेले फणस व आठळ्या या सर्वांपासून अनेक उत्पादने तयार करता येतात व त्यांना मोठी मागणीही आहे. एवढेच नव्हे तर फणसाच्या खाण्यायोग्य नसलेला भागही गुरांच्या खाद्यासाठी वापरता होतो.
सदर प्रशिक्षणात फणस वेफर्स, पल्प, पोळी, हलवा, गरे पावडर, फणस कणी, बिस्किटं, समोसा, भाजी, कटलेट, लोणचे, जॅम, क्वॅश, सिरप, फणस पुरणपोळी, चॉकलेट, आईस्क्रीम वगैरे उत्पादनांचे प्रात्यक्षिकसह प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सोबत फणसप्रक्रिया उद्योगाची पार्श्वभूमी, उद्योगासाठी आवश्यक मशिनरीची माहिती, पॅकेजिंग, लेबलिंग, मार्केटिंग, उद्योगासाठी आवश्यक परवाने, नोंदणी, शासनाच्या अनुदानित कर्ज विषयक व इतर योजना याबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
या सुवर्ण संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन संकल्प प्रतिष्ठान द्वारा करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संकल्प प्रतिष्ठान, हायवे व्ह्यू रेस्टॉरंटच्या मागे, गडनदी पुलाजवळ, वागदे, कणकवली येथे किंवा ९१४५४२८३३८ वर संपर्क साधावा.





